‘मंकीपॉक्स’विषयी मुंबई महानगरपालिकेकडून जनजागृतीस प्रारंभ !

मुंबई – ‘मंकीपॉक्स’ या आजाराच्या संदर्भात मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती चालू केली आहे. मुंबई विमानतळावर परदेशातून येणार्‍या प्रवाशांची पडताळणी केली जात आहे. कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे. नागरिकांचे घेतलेले चाचणीनमुने पडताळणीसाठी पुणे येथील एन्.आय.व्ही. प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. आफ्रिकेतील देशांमधून मागील २१ दिवसांत प्रवास केलेल्या व्यक्तीमध्ये या आजाराची लक्षणे आढळली, तर त्या व्यक्तीने तात्काळ नजीकच्या चिकित्सालयात पडताळणी करून घ्यावी, अशी सूचना आरोग्य विभागाने केली आहे.

‘मंकीपॉक्स’ हा विषाणूजन्य झुनोटिक रोग असून तो प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटीबंधीय भागात आढळतो. त्याचे चिकित्सिय सादरीकरण हे देवी रोगासारखे आहे. मंकीपॉक्स देवीरोगापेक्षा अल्प संसर्गजन्य आणि अल्प गंभीर आहे. या आजाराविषयीची माहिती मुंबईतील सर्व खासगी आणि शासकीय आरोग्य संस्था यांना देण्यात आली आहे. २३ मेपर्यंत भारतात मंकीपॉक्सचा कोणताही संशयित किंवा पुष्टी झालेला रुग्ण आढळलेला नाही.

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे

१. ताप किंवा पुरळ, तसेच मोठ्या प्रमाणात गाठी येतात.

२. पोट किंवा पाठ यांऐवजी चेहरा आणि हात-पाय यांवर पुरळ अधिक असतात.

३. ही लक्षणे २ ते ४ आठवड्यांपर्यंत असतात.