१ जूनपासून ६ प्रकारे कचरा वर्गीकरण न केल्यास सोलापूर येथे दंडात्मक कारवाई होणार !

कचर्‍याचे विविध प्रकारचे वर्गीकरण

सोलापूर, २५ मे (वार्ता.) – घरगुती कचर्‍याचे विविध ६ प्रकारचे वर्गीकरण न केल्यास १ जूनपासून दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. २१ मे या दिवशी आयुक्तांनी घनकचरा विभागातील अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक यांची आढावा बैठक घेण्यात आली. मागील २ वर्षांपासून कचर्‍याचे ओला आणि सुका कचरा यांचे वर्गीकरण करण्याविषयी नागरिकांना वेळोवेळी आवाहन केले होते; मात्र नागरिकांकडून त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेची अपेक्षित उद्दिष्टे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे १ जूनपासून दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना आता ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा, घरगुती जैव-वैद्यकीय कचरा, ई-कचरा, प्लास्टिक कचरा अशा ६ प्रकारचे वर्गीकरण करावे लागणार आहे.