‘उगवत्या सूर्या’तील भारत !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘उगवत्या सूर्याची भूमी’ अर्थात् जपान येथील २ दिवसांचा दौरा नुकताच पूर्ण झाला. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासमवेत द्विपक्षीय बैठक, जपानसमवेत व्यापार वाढण्यासाठी मोदी यांच्या विविध उद्योगपतींसमवेत झालेल्या बैठका, टोकियोत पार पडलेली ‘क्वाड’ नामक ४ देशांच्या समूहाची बैठक हे या नियोजनातील महत्त्वपूर्ण कार्यक्रम होते. भारत, जपान यांच्यासह ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या सदस्य देशांचे प्रमुख या बैठकीत सहभागी झाले होते; परंतु मोदी यांना जपानच्या तीन माजी पंतप्रधानांकडून एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाणे, हे त्यांच्या दौऱ्याचे आगळे वैशिष्ट्य ठरले. मोदी आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची मैत्री तर जगजाहीरच आहे; परंतु आबे यांच्यासमवेत योशिहिदे सुगा आणि योशिरो मोरी यांच्याशीही मोदी यांचे चांगले संबंध आहेत. ही भेट एकीकडे आणि फेब्रुवारी मासात पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रशिया दौऱ्याकडे पाठ फिरवून व्लादिमिर पुतिन यांनी रशियन सुद्धसज्जतेस प्राधान्य देणे, हे दुसरे टोक ! विदेशी धोरणासंदर्भात पाकचा हा पराजय आहे !

सुगा यांच्याविषयी म्हटले, तर ते गेल्या वर्षीपर्यंत जपानचे पंतप्रधान होते; परंतु योशिरो मोरी हे तब्बल २० वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांच्या कार्यकाळातील जपानी पंतप्रधान ! त्यामुळे तिघा माजी राष्ट्रप्रमुखांनी दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला आमंत्रित करणे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे ! तिघांनी मोदी यांच्याशी चर्चा करतांना उभय देशांमधील संबंध अधिक सुदृढ होण्यावर भर दिला. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धानंतर जगाचे दोन उभे गट पडतील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे जपानने उचललेले हे पाऊल मुत्सद्देगिरीचेही आहे ! तरीही या मुत्सद्देगिरीला भारतीय संस्कृतीची सोनेरी किनार आहे. योशिहिदे सुगा यांचा ‘गणेश ग्रुप’ नावाचा खासदारांचा गट आहे. या गटाने ‘अडथळ्यांवर मात व्हावी’, यासाठी त्यांच्या गटाला विघ्नहर्त्या श्री गणेशाचे नाव दिले. योग्य संधी साधून पंतप्रधान मोदी यांनीही सुगा यांचे याविषयी कौतुक करून त्यांना अन् त्यांच्या खासदारांना यंदाचा गणेशोत्सव पहाण्यासाठी भारतात आमंत्रित केले. सांस्कृतिक राष्ट्रवादाचे वारे भारतात वहात असून 00भारताबाहेरही अशा प्रकारे त्याचे पडसाद उमटत आहेत, हे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायी !

भारतात आणि भारताबाहेर सांस्कृतिक राष्ट्रवादाचे वारे वहाणे, हे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायी !