मुंबई, २४ मे (वार्ता.) – अभिनेत्री केतकी चितळे यांच्याविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’ कायद्याद्वारे चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अशा प्रकारे ‘ॲट्रॉसिटी’ कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याने तो रहित करावा, अशी मागणी करणी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी २३ मे या दिवशी पत्रकार परिषदेत केली. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अनंत करमुसे आणि हिंदु महासभेचे श्री. कृष्णा यादव उपस्थित होते.
श्री. सेंगर पुढे म्हणाले, ‘‘ॲट्रॉसिटी कायद्यामुळे जातीजातींमध्ये फूट पडली आहे. सरकार एकीकडे ‘जातीयवाद निर्माण करू नका’, असे आवाहन करते आणि दुसरीकडे ठराविक जातींसाठी वेगळे कायदे बनवते. केतकी चितळे यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवता येऊ शकत नाही. तक्रारदाराने स्वत:ला बौद्ध ‘जाती’चे असल्याचे म्हटले आहे. बौद्ध हा धर्म आहे. या नावाची जात नाही. या कायद्याचा दुरुपयोग करून खुल्या वर्गातील नागरिकांवर खोटे गुन्हे नोंदवले जात असल्याचे आढळून येते. त्यामुळे एकतर हा कायदा सर्वांसाठी लागू करावा किंवा तो रहित करावा.’’