महर्षींची दिव्य वाणी
जगातील नैसर्गिक गोड पदार्थ म्हणजे ‘मध.’ त्यामध्ये गोडपणा ईश्वरानेच निर्माण केला आहे. युगानुयुगे मधमाश्या मध गोळा करतात. त्या मधमाश्यांना कुणी पगार देत नाही. ईश्वराने जे कार्य त्यांना नेमून दिले आहे, त्या तेवढेच करतात; मात्र मनुष्य ईश्वराने नेमून दिलेल्या धर्मसिद्धांतांच्या विरुद्ध कार्य करतो; म्हणून तो अधर्मी बनतो.
अध्यात्म स्वतः अनुभवल्याविना त्यातील चैतन्याचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही !
ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध घेतल्याविना त्याचा सुगंध कळत नाही, त्याचप्रमाणे साधना करून अध्यात्माचा अनुभव घेतल्याविना मनुष्याने त्याविषयी बोलू नये. ज्याप्रमाणे फुलातील सुगंधाचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही, त्याचप्रमाणे अध्यात्मातील चैतन्याचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही.
आस्तिक मनुष्याने नास्तिकाची संगत धरू नये !
बांबू उसासारखा दिसतो; मात्र आपण जसा ऊस खातो, तसा बांबू खाऊ शकत नाही. बांबू म्हणजे ‘नास्तिक’ आणि ऊस म्हणजे ‘आस्तिक’. देवावर श्रद्धा असणारे म्हणजे ‘मध’ आणि देवावर श्रद्धा नसणारे म्हणजे ‘साखर’. मध खाल्ल्याने रोग होत नाहीत. साखर अधिक खाल्ल्याने रोग होतात. या उदाहरणांतून असे लक्षात येते की, आस्तिक मनुष्याने नास्तिकाची संगत धरू नये !
– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९२ (२९.१०.२०२१))