२१ ते २८ मे २०२२ या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचा सप्ताह आहे. त्या निमित्ताने…
हिंदुस्थानात आम्हा हिंदूंचे पूर्वज सहस्रो वर्षे राहिले अन् नांदले. आमची पवित्र स्थाने याच भूमीत आहेत. त्यामुळे हिंदुस्थान ही केवळ आमची ‘निवासभूमी’ नसून ‘पुण्यभूमी’ही आहे. आम्हाला मानाने जगायला नि मरायलाही जगाच्या पाठीवर या देशाबाहेर स्वत:ची अशी दुसरी भूमी नाही.
आमचे हिंदु राष्ट्र हे परमेश्वराचे पार्थिव प्रतीक आहे. ते या भूमीवर अनादी काळापासून ‘राष्ट्र’ म्हणून नांदत आले आहे. त्याचे लचके तोडून दुसर्यांना देण्याची भाषा काढणे म्हणजे ‘राष्ट्रद्रोह’ होय.
माझ्या हृदयात अखंड भारताचे मानचित्र (नकाशा) कोरलेले आहे. मी त्यातला कोणता भाग तोडून देऊ ? काश्मीर देईन, तर हिंदुस्थानचे शीरच तोडून दिल्यासारखे होईल. मानससरोवर देईन, तर जिथे देवांगना न्हाल्या, यक्षाने धर्मराजाला प्रश्न विचारले, ते सरोवरच जाईल ! पेशावर देईन, तर त्या प्रांतात संस्कृत व्याकरणकार पाणिनी झाला. द्वारका देईन, तर साक्षात् भगवान श्रीकृष्णाचे राज्य तिथे झाले. बंगालमध्ये कालीमातेची नि चैतन्याची पूजा होते. महाराष्ट्र म्हणाल, तर मी माझे हृदयच तोडून दिल्यासारखे होईल !
हा देश म्हणजे काही घर वा धर्मशाळा नव्हे. ते आमचे एक पवित्र मंदिर आहे. आमच्या हृदयातील अखंड भारतमातेची प्रतिमा दुभंगली, तर ती मृत होईल. मग मी तिची पूजा करू शकणार नाही; म्हणून ती प्रतिमा मला अभंगच, अखंडच ठेवली पाहिजे आणि त्याकरता प्रत्येकाने प्राणपणाने प्रतिकार केला पाहिजे.
– स्वातंत्र्यवीर सावरकर
(१९३७ ते १९४७ या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदुस्थानभर भ्रमण करून राष्ट्राच्या फाळणीविरोधात हिंदूंना जागृत करण्याचा प्रयत्न केला. आजही स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनी अनेक फाळण्या समोर दिसत आहेत. सावरकरांसारखा एकही द्रष्टा नेता आज हिंदूंकडे नाही. त्यामुळे प्रत्येक हिंदूनेच संतांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्ररक्षणाचे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे कर्तव्य पार पडण्याची नितांत आवश्यकता आहे ! – संपादक)
(साभार : ‘सावरकर दर्शन’, लेखक – श्री. द.स. हर्षे)