पुणे येथे अटक केलेल्या दलालांनी आणखी दोघांना मूत्रपिंड दिल्याचे उघड !

पुणे – शहरातील ‘रुबी हॉल क्लिनिक’मधील मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण प्रकरणी पोलिसांनी अटक केलेले दलाल अभिजित गटणे आणि रवींद्र रोडगे यांनी अजून दोघांना मूत्रपिंड मिळवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच त्या दोघांनीही स्वत:चे मूत्रपिंड दिल्याचे पोलीस अन्वेषणातून पुढे येत आहे. रोडगे यांनी स्वत:चे मूत्रपिंड कल्याणीनगर येथील दिशा कोचर हिला दिले आहे, तर गटणे यांनी वर्ष २०१२ मध्ये बेंगळुरू येथील रतन पाटील यांना मूत्रपिंड दिले आहे. या दोन्ही मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या वेळी खोटी कागदपत्रे दाखवली गेली असल्याचे पुढे आले आहे. (मूत्रपिंडाच्या व्यापाराचे हे गंभीर प्रकरण असून पोलिसांनी याची पाळेमुळे खणून काढून संबंधितांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. – संपादक)

या दोघांनी मिळून ६ वर्षांपूर्वी बदलापूर येथील डॉ. निमसाखरे यांच्या वडिलांना इस्लामपूर (जिल्हा सांगली) येथील गजेंद्र ठोंबरे यांचे मूत्रपिंड मिळवून दिले. त्या प्रत्यारोपणाचे शस्त्रकर्म ठाणे येथील ‘ज्युपिटर हॉस्पिटल’मध्ये पार पडले, तर २ वर्षांपूर्वी पंढरपूर येथील विठ्ठल बागल यांना पुण्यातील राणी नामा या महिलेचे मूत्रपिंड दिले. त्याचे शस्त्रकर्म कोईंबतूर येथील ‘के.एम्.सी.एच्. हॉस्पिटल’मध्ये पार पडले. प्रत्येक मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या वेळी खोटी कागदपत्रे सादर केली आहेत. खोटी कागदपत्रे सादर करून भलत्याच व्यक्तींना मूत्रपिंड दिल्याची आणखी दोन प्रकरणे या गुन्ह्याच्या अन्वेषणातून पुढे येत आहेत. गुन्ह्याची व्याप्ती वाढतच असून त्याची सविस्तर चौकशी करण्यासाठी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.