परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना देहली सेवाकेंद्रातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१३.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना देहली सेवाकेंद्रातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. श्री. अभय वर्तक

१ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा आहे’, असे समजल्यावरही भाव जागृत न होणे, भाव ठेवण्याचा प्रयत्न करूनही आनंद न मिळणे : ‘माझ्या साधनेची स्थिती चांगली नाही आणि मी अजूनही अंतर्मुख होत नाही; म्हणून मला वाईट वाटत होते. ‘पुढे काय करायचे ?’, याची मला दिशा मिळत नव्हती. त्यामुळे माझे मन पुष्कळ उदास होते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव सोहळा आहे’, हे समजल्यावरही ‘मला पुष्कळ आनंद झाला आहे. माझा भाव जागृत झाला आहे’, असे झाले नाही. मी भाव ठेवण्याचा प्रयत्न करत होतो; पण मला आनंद मिळत नव्हता.

१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१ आ १. अंतर्मुख होणे, डोळ्यांतून भावाश्रू वहाणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांशी बसलो आहे’, असे जाणवणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा चालू झाल्यापासून माझे मन अंतर्मुख होऊ लागले. सोहळा पहातांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वहात होते. ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांशी बसलो आहे’, असे मला जाणवत होते. त्यांचा तोंडवळा पाहून माझे मन तृप्त होत होते. सोहळा झाल्यावर ‘काही क्षणच सोहळा पाहिला’, असे मला वाटत होते. ‘आपल्याला किती महान गुरु लाभले आहेत !’, असे वाटून मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

१ आ २. ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि सद्गुरु सुश्री (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ करून घेतला नाही’, याची खंत वाटणे : ‘मला सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि सद्गुरु सुश्री (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या मार्गदर्शनानुसार सेवा करण्याची संधी वारंवार मिळाली. त्यांनी माझ्यावर पुष्कळ प्रेम केले, तरीही मला त्या वेळी त्यांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेत आला नाही’, याची आता आठवण झाल्यावर मला पुष्कळ खंत वाटते आणि रडू येते. ‘महान गुरुमाऊलीच्या महान शिष्यांच्या सान्निध्यात राहूनही माझा ईश्वरप्राप्तीचा निश्चय अल्प पडला आणि मी मायेत गुंतलो’, हे आठवल्यावर माझा जीव कासावीस होतो.

१ आ ३. माझे मन गुरूंच्या जन्मोत्सवात अंतर्मुख झाले. ‘श्रीगुरूंच्या कृपेने ज्या कारणासाठी माझा जन्म झाला, त्यासाठी तेच मला एकेक पाऊल पुढे नेत आहेत’, ही माझ्यासाठी मोठी अनुभूती होती.

मी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या समवेत सेवा करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. मी पुन्हा तीच चूक करणार नाही. श्री गुरूंना अपेक्षित अशी सेवा करतांना मी अंतरीचा भाव जागृत ठेवीन. ‘माझे मन आणि बुद्धी श्रीगुरूंच्या चरणी अर्पण होऊ दे’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.’

२. कु. मनीषा माहुर

२ अ. रांगोळी काढतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले येणार आहेत’, असे वाटणे : ‘१३.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा साधकांना ‘ऑनलाईन’ दाखवण्यात येणार होता. त्यानिमित्त मला आश्रमात रांगोळी काढण्याची सेवा होती. रांगोळी काढतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले येणार आहेत’, असे मला वाटत होते. त्या वेळी वातावरण शांत आणि स्थिर होते. ‘सर्व जण भगवंताच्या येण्याची प्रतीक्षा करत आहेत’, असे मला वाटत होते.

२ आ. ‘साधकांच्या अडचणी सुटून त्यांना सोहळा पहायला मिळावा’, असा विचार परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मनात येणे : सोहळा पहातांना साधकांना तांत्रिक अडचणी येत होत्या. माझ्याकडे संपर्काची सेवा असल्यामुळे त्यांच्याशी समन्वय करतांना मी सोहळा पाहू शकत नव्हते, तरीही ‘साधकांच्या अडचणी सुटून त्यांना सोहळा पहायला मिळावा’, असा विचार परात्पर गुरुदेवांच्या कृपेने माझ्या मनात येत होता. सोहळा पहातांना मला आनंदाची अनुभूती येत होती आणि सोहळा झाल्यावरही मला आनंद जाणवत होता.

२ इ. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने सकारात्मक रहाता येणे : सोहळा पहाण्याच्या नियोजनात अनेक पालट होत होते आणि अडचणी येत होत्या, तरीही परात्पर गुरुदेवांच्या कृपेने माझे मन सकारात्मक होते. मला प्रत्येक परिस्थिती सहजतेने स्वीकारता येत होती. ‘ही ईश्वराची लीला आहे. याचा आनंद मला घ्यायचा आहे’, असे मला वाटत होते.’

३. श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)

‘जन्मोत्सव सोहळ्यात परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना मार्गदर्शन करत असलेली ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. त्यांचे मार्गदर्शन ऐकून मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहे.

३ अ. स्वयंसूचना देण्याचे लक्षात आलेले महत्त्व

१. स्वयंसूचना देतांना ‘मनाने काय करायला पाहिजे आणि काय करायला नको ?’, याची जाणीव मनाला करून देणे, असा स्वयंसूचनेचा अर्थ माझ्या लक्षात आला.

२. आपल्या अंतर्मनावर जन्मोजन्मींचे अनेक संस्कार असतात. स्वयंसूचना दिल्यामुळे अंतर्मनातील अयोग्य संस्कार आणि स्वभावदोष नष्ट होण्यास साहाय्य होते.

३. आपल्याकडून व्यष्टी साधना होत नसेल, तर स्वयंसूचना देऊन आपण व्यष्टी साधना चांगली करू शकतो.

४. आपण आपल्या प्रत्येक स्वभावदोषावर स्वयंसूचना सत्र करून आपले स्वभावदोष दूर करू शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो.

३ आ. साधनेच्या प्रयत्नांविषयीचे गांभीर्य

१. आपण ‘माझ्याकडून साधनेचे प्रयत्न होत नाहीत’, असे म्हणतो; परंतु ‘आपल्याकडून ते का होत नाहीत ?’, याचे आपण मुळापर्यंत जाऊन कारण शोधायला हवे.

२. साधना होत नसेल, तर स्वतःला शिक्षा केल्यास साधनेचे गांभीर्य लक्षात येईल आणि साधनेसाठी योग्य प्रयत्न होतील.

३ इ. आपण मनमोकळेपणाने बोललो, तर आपला मनोलय होऊन आपल्याला ईश्वराशी एकरूप होण्यासाठी साहाय्य मिळेल.

३ ई. रात्री अनिष्ट शक्तींपासून रक्षण व्हावे, यासाठी साधकांनी भ्रमणभाषवर नामजप लावून ठेवावा.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २९.०८.२०२०)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक