संभाजीनगर – येथे जूनमध्ये भाजपची मोठी बैठक होणार असून या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे, तसेच येथील महापालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे. विशेषत: मागील काही दिवसांच्या घडामोडी पहाता भोंगे प्रकरणाच्या वादानंतर, तसेच दौलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होण्याच्या एम्.आय.एम्. नेत्यांच्या कृतीनंतर ध्रुवीकरणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो.
यापूर्वी ही बैठक २७ आणि २८ मे या दिवशी ठरवण्यात आली होती; मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही या बैठकीत विशेष आमंत्रित म्हणून उपस्थिती आवश्यक असल्याने ही बैठक जूनमध्ये होणार आहे. २३ मे या दिवशी शहरातील पाणीप्रश्नावरून देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘जेवढे दिवस पाणी, तेवढेच दिवस पाणीपट्टी आकारा’, अशी मागणी या मोर्चातून केली जाणार आहे.