Israel Close Dublin embassy : आयर्लंडने पॅलेस्टाईनला मान्यता दिल्याने इस्रायलने आयर्लंडमधील दूतावास केला बंद !

तेल अविव (इस्रायल) – आयर्लंडने पॅलेस्टाईनला वेगळा देश म्हणून मान्यता दिल्यानंतर इस्रायलने आयर्लंडमधील त्याचा दूतावास बंद करण्याची घोषणा केली आहे. इस्रायलने मे महिन्यातच आयर्लंडमधून त्याच्या राजदूतांना परत बोलावले होते. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिडॉन सार यांनी आयर्लंडवर दुटप्पीपणा आणि इस्रायलविरोधी धोरण राबवल्याचा आरोप केला आहे. दक्षिण आफ्रिकेने इस्रायलविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केलेल्या नरसंहाराच्या खटल्यालाही आयर्लंडने पाठिंबा दिला आहे. याला इस्रायलने विरोध केला होता.

आयर्लंडचे पंतप्रधान सायमन हॅरिस यांनी इस्रायलच्या निर्णयावर अप्रसन्नता व्यक्त केली आहे. हॅरिस यांनी इस्रायलवरील आरोप फेटाळून लावले आहेत. हॅरिस म्हणाले की आयर्लंड शांतता, मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय कायदा यांसाठी उभा आहे. दुसरीकडे आयर्लंडचे परराष्ट्रमंत्री मायकल मार्टिन यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध कायम राहतील. आयर्लंड इस्रायलमधील दूतावास बंद करणार नाही.