उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा विधानसभेत विरोधकांना प्रश्न !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – देशात मुसलमानांचे सण निवांतपणे साजरे केले जातात. मंदिरासमोरून मुसलमानांची मिरवणूक निघू शकते, तर मशिदीसमोरून हिंदूंची मिरवणूक का निघू शकत नाही ? ज्या भागांत मुसलमान लोकसंख्या अधिक आहे, तिथेच दंगली का होतात? मुसलमानबहुल भागांत भगवा झेंडा लावतांना एका हिंदु तरुणाला ठार केले जाते. कुणी स्वतःच्या देशात झेंडा का लावू शकत नाही ? भगवा ध्वज फडकवता येत नाही का?, असे प्रश्न उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संभल येथे ५ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंसाचारावरून बोलतांना उपस्थित केले. ‘पुराणात असेही म्हटले आहे की, भगवान विष्णूचा दहावा अवतार (कल्कि अवतार) केवळ संभलमध्येच होईल’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
योगी आदित्यनाथ यांनी मांडलेली सूत्रे
१. जर तुम्ही पश्चिम उत्तरप्रदेशात गेला, तर सामान्य लोक एकमेकांशी संवाद साधतांना प्रथम राम-रामच म्हणतात, मग ‘जय श्रीराम’ म्हणणे म्हणजे धर्मांधता, हे कसे ? आम्ही एकमेकांना भेटल्यावर राम-राम म्हणतो. कुणी ‘जय श्रीराम’ म्हटल्यास त्यामागील हेतू समजून घ्यायला हवा.
२. संभल आणि लक्ष्मणपुरी येथील शिया आणि सुन्नी यांच्यातील संघर्ष खूप जुना आहे. भाजप सरकारच्या आधी मुसलमानांंमध्ये परस्पर हिंसाचार व्हायचा. पूर्वीची सरकारे ‘फूट पाडा आणि राज्य करा’ या विचारसरणीवर काम करत असत. सध्या स्थानिक आणि परदेशी मुसलमान यांच्यातील संघर्ष तुम्ही (विरोधक) झाकण्याचा प्रयत्न करत आहात, हे खरे नाही का ? कुणीही सूर्य, चंद्र आणि सत्य फार काळ लपवू शकत नाही.
३. विरोधी पक्षनेते म्हणतात ‘संभल येथे मंदिर असल्याचे समोर आले, तर मंदिर बनवणार का ?’ ‘बाबरनामा’ असे सांगतो की, प्रत्येक मशीद मंदिर पाडूनच बांधली गेली आहे. याविषयी तुम्हाला काय म्हणायचे आहे ?
४. १९ नोव्हेंबर या दिवशी येथे सर्वेक्षण करण्यात आले. २४ नोव्हेंबरलाही सर्वेक्षणाचे काम चालू होते. २३ नोव्हेंबर या दिवशी शुक्रवारच्या नमाजापूर्वी आणि नंतर दिलेल्या भाषणांमुळे तेथील वातावरण बिघडले. ‘आम्ही न्यायिक आयोग स्थापन करू’, असे आमच्या सरकारने आधीच सांगितले आहे. सत्य सर्वांसमोर येईल.
५. संभलमध्ये आज हनुमान मंदिर सापडले आहे. विहिरीत मूर्ती सापडत आहेत. २२ विहिरी बुजवण्यात आल्या आहेत. माजी खासदार सफीकुर रहमान बर्क यांनी स्वतःला कधीच भारतीय मानले नाही. ते म्हणत असत की, ते बाबरचे पुत्र आहेत. आम्ही सांगू इच्छितो की, श्रीरामाची संस्कृती भारतात कायम राहील, बाबराची संस्कृती रहाणार नाही.
६. संभल येेथे वर्ष १९७६, १९७८, १९८२, १९८६, १९९०, १९९२, १९९६ या वर्षांत सतत दंगली झाल्या. या दंगलींमध्ये २०९ हिंदूंची हत्या झाली आहे; पण त्या निरपराध हिंदूंबद्दल कुणी २ शब्दही बोलले नाहीत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातील धार्मिक दंगली ९७ टक्क्यांनी अल्प झाल्या आहेत. वर्ष २०१२ ते २०१७ या काळात समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात ८१५ धार्मिक दंगली झाल्या. यामध्ये १९२ जणांचा मृत्यू झाला. त्यापूर्वीच्या कार्यकाळामध्ये ६१६ दंगली झाल्या होत्या. ज्यामध्ये १२१ लोकांचा मृत्यू झाला.
७. संभल दंगलीत सहभागी असलेल्या लोकांनी हाता बंदुका घेतल्याचे, दगडफेक केल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. कुणीही गुन्हेगार शिक्षेपासून स्वतःला वाचवू शकणार नाही. दंगल आणि दंगलखोर यांविषयी सरकारला अजिबात सहानुभूमी नाही. कुणी अराजक निर्माण केल्यास, त्याला सोडले जाणार नाही.
८. भारत असा देश आहे जिथे बहुसंख्य समाज समान नागरी कायद्याची मागणी करत आहे. त्याची मागणी काही वाईट नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश रोखण्याची विरोधकांची मागणी आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जेव्हा समान नागरी कायद्याविषयी बोलले, तेव्हा विरोधकांनी त्यांच्याविरुद्ध महाभियोगाची नोटीस दिली.
७. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेत ‘धर्मनिरपेक्ष’ किंवा ‘समाजवाद’ असा एकही शब्द नाही. तुम्हाला (विरोधकांना) लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून सत्ता बळकवायची आहे.