सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य !
‘गुरु-शिष्य’ नाते हे जगातील सर्वाेत्कृष्ट नाते आहे. गुरूंचे कार्य शिष्य आणि समाज यांच्यापर्यंतच सीमित असते; पण ईश्वराचा अवतारच ‘गुरु’ या रूपात प्रकट झाला, तर ‘त्याचे कार्य कसे असेल ?’, याचे चालते-बोलते उदाहरण म्हणजे ‘परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे अलौकिक कार्य !’ आधुनिक वैद्य, आदर्श पुत्र, आदर्श पती, उत्तम शिष्य, अनेक ग्रंथांचे संकलक, गुरु, द्रष्टा, संशोधक, अशा अनेक रूपांमध्ये कार्य करणाऱ्या गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अवतारी कार्य कसे अलौकिक आहे ?’, हे या लेखांतून क्रमशः जाणून घेणार आहोत.
(भाग ४)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/580516.html
१. काही जिवांची पूर्वपुण्याई फळाला आल्यावर ते अवताराच्या संपर्कात येणे
अवतार सर्व प्रकारच्या जिवांच्या जीवनाला स्पर्श करतो; किंबहुना तो त्यांच्या जीवनाला जाऊन भिडतो. अवतार भक्तांचे जीवनच पालटून टाकतो. सर्व चांगल्या जिवांना भारतभूमीत जन्म घेणे शक्य नाही; कारण त्यासाठी पूर्वपुण्याई लागते, तसेच पूर्वपुण्याईनेच हिंदु धर्मात जन्म मिळतो. काही जीव त्यांच्या प्रारब्धानुसार विदेशात किंवा अन्य पंथांत जन्म घेतात. अशा जिवांची पूर्वपुण्याई फळाला आल्यावर ते अवताराच्या संपर्कात येतात. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे विदेशातून साधना शिकण्यासाठी आलेले साधक होत !
२. विदेशातील शेकडो जिवांच्या मनात ‘भारतात जाऊन परात्पर गुरु डॉक्टरांना भेटूया आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाऊन साधना करूया’, असे विचार येणे
‘विदेशातील शेकडो जिवांना प.पू. भक्तराज महाराज किंवा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी स्वप्नदृष्टांत झाले आहेत, तसेच गुरुकृपायोगानुसार साधनेला आरंभ केल्यावर अनुभूती आल्या आहेत. त्यांतील अनेक जिवांच्या मनात ‘भारतात जाऊन परात्पर गुरु डॉक्टरांना भेटूया आणि ते निवास करत असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाऊन साधना करूया’, असे विचार येतात. अशा जिवांमध्ये काही देशांमधील त्या त्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीही आहेत.
३. परात्पर गुरु डॉक्टरांनी विदेशातील मायावी वातावरणातही चैतन्याच्या स्तरावर अध्यात्मप्रसार करण्यास सक्षम असलेले साधक आणि संत सिद्ध केले असणे
‘अशा शेकडो जिवांना प्रेरणा देणे, त्यांच्यामध्ये भारत आणि सनातन धर्म यांविषयी आपुलकी निर्माण होणे, अशा जिवांनी साधना करण्यास आरंभ करणे, त्यांना अनुभूती येऊन त्यांनी साधना वाढवून आध्यात्मिक प्रगती करणे, त्यांनी ‘साधक-संत-सद्गुरु’, अशी वाटचाल करणे’, या सामान्य गोष्टी नव्हेत ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विदेशातील मायावी वातावरणातही चैतन्याच्या स्तरावर अध्यात्मप्रसार करण्यास सक्षम असलेले साधक आणि संत सिद्ध केले आहेत. येणाऱ्या काळात साधकांनी विदेशातही अनेक आश्रम निर्माण केल्यास त्यात नवल नाही.
४. या संदर्भातील वैशिष्ट्य, म्हणजे गेल्या ३० पेक्षा अधिक वर्षांत परात्पर गुरु डॉ. आठवले एकदाही विदेशात गेलेले नाहीत. विदेशातील साधक परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायला भारतात येतात. त्यांच्याकडून असे कार्य केवळ अवतारच करवून घेऊ शकतो.
(क्रमश: लवकरच प्रसिद्ध करत आहोत)
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), चेन्नई, तमिळनाडू. (१२.५.२०२२)