स्थानिक भाषेच्या वापराला गुन्हा ठरवणारे आणि पोर्तुगीज भाषेत धर्मशिक्षण देणारे पाद्री

हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…

गोव्याच्या मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींपैकी एक डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा म्हणजेच डॉ. टी.बी. कुन्हा यांना गोमंतकाच्या ‘आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे. १७ मे या दिवशी आपण ‘गोव्यातील मंदिरे, ग्रंथ यांचा नाश होण्यासह भारतीय भाषांना विरोध होणे’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील भाग येथे देत आहोत.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

२०. स्थानिक भाषेच्या वापरावर कडक दंड लावणारे ख्रिस्ती पाद्री

‘स्थानिक लोकांनी आपल्या भाषेचा वापर करण्याचे सोडून पोर्तुगीज भाषा शिकणे अत्यंत जरूरीचे आहे. त्यामुळे धर्मोपदेश आणि त्यासंबंधीचे रहस्य शिकवणे पाद्रींना सोपे जाईल; कारण पाद्रींना स्थानिक भाषा येत नसल्यामुळे किंवा ‘पॅरीश’मधले लोक पोर्तुगीज शिकत नसल्यामुळे धर्मोपदेश समजणे अवघड होते. काही असो, राजकीय व्यवहार आणि आत्म्याचे आध्यात्मिक कल्याण या दोन्ही दृष्टीने ते घातक आहे. सगळ्यांना परस्परांशी व्यवहार करणे सोपे जावे; म्हणून स्थानिक लोकांनी पोर्तुगीज भाषेतून बोलावे, पाद्री आणि शिक्षक यांनी मुलांना त्याच भाषेतून शिकवावे, म्हणजे कालांतराने स्थानिक भाषेचा वापर बंद होऊन पोर्तुगीजच सर्वसामान्य भाषा होईल. त्याकरता नेहमी सर्व ठिकाणी आणि प्रसंगी, पोर्तुगीज अस्खलित होईपर्यंत तीच भाषा वापरावी. त्याकरता मी त्यांना तीन वर्षांची मुदत देत आहे. तेवढ्या अवधीत त्यांनी पोर्तुगीज शिकलं पाहिजे आणि आमच्या जमिनीविषयीचे करार आणि इतर सर्व व्यवहार त्याच भाषेतून झाले पाहिजेत. स्थानिक भाषा वापरायची नाही. तसे केल्यास त्या गुन्ह्याची नोंद घेतली जाऊन योग्य तो कडक दंड देण्यात येईल.’ (पृष्ठ क्र. ४४-४५)

डॉ. टी.बी. कुन्हा

२१. पोर्तुगीज भाषा बोलण्याचा कायदा न पाळल्याने सरकारची हानी झाल्याचे मानणारे पाद्री

‘पोर्तुगीज भाषेची सक्ती करण्याच्या प्रयत्नाची बरीचशी जबाबदारी ‘इन्क्विझिशन’ (ख्रिस्ती धर्मसमीक्षण सभा)कडे जाते. आंतोनियो आमारेल कुतीन्हा, या इन्क्विझिटरने २६ जानेवारी १७३१ या दिवशी राजाला लिहिलेल्या आपल्या पत्रात कडक उपायांची निकड स्पष्ट करतांना म्हटले ‘‘आत्म्याच्या दयनीय अधोगतीचे प्रमुख कारण म्हणजे महाराज डॉन सबास्टियनच्या आदेशान्वये दिलेला हुकूम न पाळणे हे होय. या कायद्याने स्थानिक लोकांना त्यांची भाषा बोलण्यास बंदी घातली होती आणि फक्त पोर्तुगीजच बोलण्याची सक्ती केली होती. हा कायदा न पाळल्याने बरेच दुष्परिणाम होऊन सरकारची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.’ (पृष्ठ क्र. ४५-४६)

(लेखातील दिलेले पृष्ठ क्रमांक ‘गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास’ या पुस्तकातील आहेत. इंग्रजी लेखक : डॉ. टी.बी. कुन्हा, अनुवादक : प्रफुल्ल गायतोंडे)

संपादकीय भूमिका 

पोर्तुगीज भाषेत न बोलल्यास कठोर दंड करणारे पाद्री कुठे आणि कुठे मातृभाषेत न बोलल्यास साधा दंडही न करणारे आताचे शासनकर्ते ?