संत साहित्याचे आंदणच बहुमूल्य !

नोंद 

एका वडिलांनी स्वतःच्या मुलीच्या विवाहात रुखवतामध्ये आंदण (भेट) म्हणून ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ आणि ‘सार्थ एकनाथी भागवत’ हे ग्रंथ दिले. ‘मुलीच्या आयुष्याला पुरेल, अशी ही महत्तम शिदोरी आहे’, असा त्यांचा ग्रंथ भेट देण्यामागे भाव होता. सध्याच्या काळात असा विचार करणारे पालक मिळणे दुर्मिळ आहे. याचे कारण आपल्या ऋषिमुनींनी लिहून ठेवलेले ग्रंथ जीवनासाठी किती अनमोल आहेत, याची कल्पना आपण करू शकत नाही. या ग्रंथांमधील प्रत्येक सूत्र हे जीवन जगतांना येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जायचे ? हे शिकवणारे अमृततुल्य ज्ञान आहे.

प्रत्येक व्यक्तीचा जन्म ‘प्रारब्ध भोग भोगून संपवणे आणि ईश्वरप्राप्ती करून घेणे’, यासाठीच झालेला असतो. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे हा उद्देश पुष्कळ कमी जणांना ठाऊक आहे. बहुतांश व्यक्ती जीवन जगतांना ‘प्रारब्ध भोग भोगून संपवणे आणि मौजमजा करणे’, हाच उद्देश ठेवतात. त्यामुळे ते कायमस्वरूपी मिळणाऱ्या आनंदापासून वंचित रहातात. महान हिंदु धर्मामध्ये जीवन जगतांना ‘ऐहिक आणि पारमार्थिक उन्नती कशी करून घ्यायची ?’, याचे मार्गदर्शन उपलब्ध आहे. भगवंताने मनुष्याला शाश्वत आनंद मिळवण्यासाठी काय करायला हवे ? हे सोप्या भाषेत सांगितले आहे. आपण धर्मग्रंथांचा अभ्यास न केल्यामुळे त्या ज्ञानापासून वंचित आहोत. संतांची शिकवण आणि संत साहित्याचा अभ्यास मनुष्याला स्वार्थी वृत्तीपासून परावृत्त करून आत्मज्ञानी अन् व्यापक विचार करण्यास शिकवतो. या शिकवणीमुळे मनुष्य आयुष्यातील सुख आणि दु:ख अशा प्रत्येक प्रसंगाला सहज सामोरे जाऊन यशस्वी जीवन जगू शकतो. संतांची शिकवण घेऊन संसार करणारी व्यक्ती निश्चितच आयुष्यभर समाधानी जीवन जगू शकते. यासाठी धर्मग्रंथांतील तत्त्वे केवळ वाचून सोडून न देता ते कृतीत आणणे आवश्यक आहे.

प्रत्येक मुलीच्या वडिलांना कन्यादान करावेच लागते. त्यामुळे लाडक्या लेकीला जे काही सुंदर, उपयोगी आहे, ते देण्याचा प्रयत्न प्रत्येक वडील करत असतात. जीवनोपयोगी सर्व वस्तूंमध्ये ‘धर्मग्रंथ’ आदर्श आहेत, हे लक्षात घेऊन मुलांना प्रारंभीपासूनच धर्मग्रंथांचा अभ्यास करून ते आचरणात आणण्यासाठीचे संस्कार करणे आवश्यक आहे. महिलाच कुटुंबावर चांगले संस्कार करतात. त्यामुळे प्रत्येक वडिलांनी मुलीला धर्मशिक्षण देण्यास प्राधान्य द्यावे, हेच सांगणे !

– वर्षा कुलकर्णी, सोलापूर