‘संत’ कुणा म्हणावे ?

संपादकीय 

हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्यांना व्हॅटिकन ‘संत’ घोषित करते, असा प्रघात आहे का ?
देवसहायम

मनुष्याच्या जन्माचा उद्देश ‘प्रारब्ध भोग भोगून योग्य क्रियमाण वापरून पुन्हा ईश्वराशी एकरूप होणे’, असा आहे. ईश्वराशी एकरूप होण्यासाठी ईश्वराला अपेक्षित आणि ईश्वरासारखे वर्तन करणे आवश्यक असते. यासाठी साधना करणे आवश्यक आहे. हिंदु धर्मानुसार ईश्वरप्राप्ती करण्यासाठी विविध साधनामार्ग आहेत आणि कुणी कोणत्या मार्गाने साधना करावी, याचे मार्गदर्शन करणारे संत, गुरु, उन्नतही आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना केली किंवा त्यांचे मन जिंकले, तर ईश्वरप्राप्ती लवकर होऊ शकते. असे मार्गदर्शन मिळणेही आपल्या प्रारब्धात असावे लागते, अन्यथा अनेकांचा जन्म योग्य साधना न केल्याने किंवा तसे मार्गदर्शन न मिळाल्याने ईश्वरप्राप्तीचा उद्देश राहून जाऊ शकतो. हिंदूंमध्ये साधना करून एका आध्यात्मिक टप्प्याला पोचले की, त्या व्यक्तीला ‘संत’ म्हणून ओळखता येते. तसे ओळखण्यासाठीही समोरची व्यक्ती त्या आध्यात्मिक पातळीची असावी लागते. अनेक जण आज ‘संत’ म्हणून समाजात ओळखले जात असले, तरी ते संत असतील, असे ठामपणे सांगता येत नाही, तसेच अनेकांना संत असूनही आपण ओळखू शकत नाही. हिंदु धर्मानुसार एक संतच दुसऱ्या संतांना ओळखण्याची क्षमता राखतात. अशा संतांनी एखाद्याला संत म्हणून घोषित केले, तर लोक त्यांना मानू लागतात. लोकांनाही अशा संतांच्या आचरणातून, मार्गदर्शनातून त्यांचा आध्यात्मिक अधिकार लक्षात येतो. भारतामध्ये असे सहस्रो संत होऊन गेले आहेत, ज्यांना जनतेनेच संत म्हणून ओळखले आणि त्यांना मानू लागले. महाराष्ट्रात तरी ही परंपरा पुष्कळच मोठी आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, जगद्गुरु संत तुकाराम अशी असंख्य नावे आहेत, ज्यांना कुणी कधी संत म्हणून घोषित केले नव्हते, तर त्यांच्या स्थितीवरूनच लोकांनी त्यांना जाणले; कारण त्या वेळी जनताही काही प्रमाणात साधना करणारी होती.

मुसलमानांमध्ये ‘संत’ का नाहीत ?

मुसलमानांमध्ये ‘संत’ म्हणून कुणी आहेत, असे ऐकिवात नाही. ज्या अरब देशांतून इस्लामचा जन्म झाला, तेथील एखादी व्यक्ती ‘संत’ होती, असे किंवा आता कुणीतरी संत आहे, असे ऐकिवात मिळत नाही. भारतात मुसलमानांचे अनेक प्रमुख असले, तरी ते संत आहेत, असे आढळत नाहीत. येथे तुलना करण्याचा भाग नसला, तरी ही वस्तूस्थिती आहे, असेच दिसून येते. त्यामुळे त्यांच्या या स्थितीचा अर्थ काय काढायचा, हे प्रत्येक जण ठरवू शकतो. ख्रिस्त्यांमध्ये मात्र त्यांचे प्रमुख धार्मिक केंद्र व्हॅटिकन येथे त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप हे एखाद्याला संत घोषित करण्याचा अधिकार ठेवतात. तेथे एका कार्यक्रमाद्वारेच संत म्हणून घोषित करण्यात येते. १५ मे या दिवशी व्हॅटिकनमध्ये झालेल्या कार्यक्रमात भारतातील तमिळनाडूमधील १८ व्या शतकातील देवसहायम पिल्लई यांना ‘संत’ घोषित करण्यात आले. येथे प्रश्न निर्माण होतो की, २०० वर्षांपूर्वीच्या व्यक्तीला आता संत घोषित करता येऊ शकते का ? किंवा आज इतकी वर्षे त्यासाठी का द्यावी लागली ? जर ते संत होते, तर त्यांना जिवंतपणी कुणी ओळखले नव्हते का ? देवसहायम यांचे कार्य ‘अलौकिक’ होते, असे भारतातील संस्थेकडून व्हॅटिकनला कळवण्यात आल्यावर वर्ष २०१४ मध्ये पोप यांनी त्याला मान्यता दिल्यानंतर आज ८ वर्षांनी त्यांना संत घोषित करण्यात आले.

कथित संतांना उघडे पाडा !

देवसहायम

आता देवसहायम यांचे ‘अलौकिक कार्य’ म्हणजे काय, हे लक्षात घ्यायला हवे. विशेष म्हणजे देवसहायम हे ब्राह्मण होते. ते तेथील हिंदु राजघराण्यात अधिकारी होते. त्यांनी नंतर धर्मांतर केले आणि ख्रिस्ती झाले. त्यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करून असंख्य हिंदूंचे धर्मांतर केले, तसेच ‘राजघराण्यातील गोपनीय माहिती डचांना दिली’, असा त्यांच्यावर आरोप आहे. पुढे त्यांना स्थानिकांनी ठार मारल्याचे म्हटले जाते. ‘त्यांच्या या धर्मांतराच्या ‘अलौकिक’ कार्यामुळेच त्यांना ‘संत’ घोषित केले आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित होतो. यापूर्वी व्हॅटिकनकडून मदर तेरेसा यांना मृत्यूनंतर काही वर्षांनी ‘संत’ घोषित केले होते. त्यांच्या संत असण्यावर ख्रिस्त्यांनाच आक्षेप होता, असे म्हटले जात होते. त्यामुळे त्यांना त्या जिवंत असतांना संत म्हणून घोषित करण्यात आले नव्हते. असे असले, तरी त्यांच्या एकूणच समाजकार्याविषयी संशय आहे. समाजकार्याच्या नावाखाली त्यांनी हिंदूंचे धर्मांतर केल्याचा त्यांच्यावर आरोप होते. त्यामुळे हिंदु संघटना त्यांना कदापि संत म्हणून स्वीकारू शकत नाहीत. ‘हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्यांना व्हॅटिकन ‘संत’ म्हणून घोषित करते, असा प्रघात आहे’, असे कुणी म्हणू लागले, तर त्याला चुकीचे कसे म्हणता येईल?  गोव्यामध्ये १५ व्या शतकातील फ्रान्सिस झेवियरच्या सांगण्यावरून हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर चालू झाले. हिंदूंवर नाना प्रकारचे अत्याचार करून त्यांना धर्मांतरित करण्यात आले, हा इतिहास आहे. हा इतिहास दडपून झेवियरला ‘संत’ ठरवले जात आहे. त्याला ‘गोंयचा सायब’ म्हणून मिरवले जात आहे. यातून ख्रिस्ती कुणाला संत म्हणतात, हे लक्षात येते. मुसलमानांमध्ये पूर्वीच्या काही जणांना ‘संत’ म्हणून सांगितले जाते, त्यांचा दर्गा बनवून तेथे सहस्रोंच्या संख्येने लोक जातात. हिंदूही जातात; मात्र या कथित संतांचा इतिहास पाहिला, तर त्यांनीही हिंदूंच्या धर्मांतरासाठी कार्य केल्याचे दिसून येते. दुसरीकडे हिंदूंच्या एकातरी संतांनी कधी धर्मांतरासाठी प्रयत्न केल्याचे ऐकिवात आहे का ? जे धर्मांतरित झाले, ते स्वच्छेने हिंदु धर्मात येत असतील, तर त्यांना परत घेण्याचा प्रयत्न काही संतांनी केला, हाही इतिहास आहे. आजही असे अनेक संत हिंदूंचे शुद्धीकरण करण्याचे कार्य करत आहेत. त्याला कुणी विरोध करू शकत नाही. सध्या देशात ज्ञानवापी मशीद, मथुरेतील शाही इदगाह मशीद, ताजमहाल यांचा खरा इतिहास समोर आणण्यासाठी न्यायालयीन लढा दिला जात आहे. त्याच प्रकारे ख्रिस्ती पंथातील संतांचा खरा इतिहास शोधण्यासाठी लढा देण्याची आवश्यकता आहे. यातून कोण मानवतावादी होते ? आणि कुणी अत्याचार केले ?, हे जगासमोर येईल. यासाठी सरकारने पुढाकार घेऊन इतिहास संशोधन करावे, असेच वाटते !