मुंबई – रेल्वेच्या तिकिटांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या दलालांवर मध्य रेल्वे दलालविरोधी पथकाने कारवाई केली आहे. यात १ लाख ६२ सहस्र रुपये मूल्य असलेली ८९ तिकिटे कह्यात घेण्यात आली. मध्य रेल्वेचे दलालविरोधी पथक आणि आर्.पी.एफ. यांच्या साहाय्याने वाणिज्य शाखेने ही मोहीम राबवली. मागील आर्थिक वर्षात दलालविरोधी पथकाने दलालांविरुद्ध २७ गुन्हे नोंदवले होते. यामध्ये ७ लाख ९९ सहस्र ७५९ रुपये किमतीची ६४६ तिकिटे कह्यात घेण्यात आली होती. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने प्रवाशांना ‘तिकिटे अधिकृत दलाल किंवा संगणकीकृत आरक्षण केंद्र येथून खरेदी करावीत किंवा आय.आर्.सी.टी.सी.च्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी’, असे आवाहन मध्य रेल्वेच्या प्रशासनाने केले आहे.