संकटकाळात स्वत:चे रक्षण करण्यासाठी साधना अपरिहार्य ! – सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा येथे ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ !

डावीकडून श्री. हरिष गांधी, पू. अशोक पात्रीकर, ह.भ.प. लताप्रसाद तिवारी आणि श्री. सुनील घनवट

वर्धा, १५ मे (वार्ता.) – सध्या कोरोनातून दिलासा मिळाला असला, तरी त्यातून पूर्ण सुटका झालेली नाही. जगात युद्धजन्य परिस्थिती आहे. शेजारी राष्ट्रांमध्ये अराजक माजले आहे. हिंदु धर्मावर सतत आक्रमणे होत आहेत. त्यामुळे समाजजीवन अस्थिर झाले आहे. यातून आपले रक्षण करायचे असेल, तर साधनेविना पर्याय नाही. साधनेमुळे आत्मबळ निर्माण होईल. आत्मबळामुळे आपले कोणत्याही संकटकाळात रक्षण होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत पू. अशोक पात्रीकर यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ मे या दिवशी येथे ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला संबोधित करतांना ते बोलत होते. या वेळी ह.भ.प. लताप्रसाद तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट, व्यावसायिक श्री. हरिष गांधी आणि समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी संबोधित केले.

हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी विद्यार्थ्यांना भगवद्गीता शिकवणे आवश्यक ! – ह.भ.प. लताप्रसाद तिवारी, वर्धा

हिंदूंचा ‘भगवद्गीता’ हा अनादी ग्रंथ आहे. अर्जुनाला कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी भगवंताने गीता सांगितली. आजही समाज धर्माचरण आणि कर्तव्य यांच्यापासून लांब गेला असून भरकटला आहे. त्यामुळे समाजाला योग्य मार्गावर आणण्यासाठी गीता शिकवणे आवश्यक आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांना गीता शिकवली जाणार नाही, तोपर्यंत हा देश हिंदु राष्ट्र होणार नाही.

हिंदूंना त्यांची खरी ओळख पटवून देणे आवश्यक ! – हरिष गांधी, व्यावसायिक

सध्या हिंदूंची स्थिती सिंहाच्या बछड्यासारखी झाली आहे. तो मेंढ्यांच्या कळपात राहिल्यामुळे स्वत: मेंढरू समजायचा; पण त्याची सिंहाशी गाठ पडल्यावर त्याला सिंह असल्याचा साक्षात्कार झाला. त्याप्रमाणे हिंदूंमध्ये सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता यांचे विष भिनवण्यात आले आहे. हिंदूंना त्यांची खरी ओळख पटवून देण्याची आवश्यकता आहे.

क्षणचित्रे

१. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी अधिवेशनासाठी दिलेला संदेश वाचून दाखवण्यात आला.

२. ‘हिंदु जनजागृती समितीने सर्वप्रथम ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र समोर आणले आहे. समिती जशी अर्जुन होऊन लढत आहे, तशीच ती श्रीरामाची वानरसेना बनूनही कार्य करत आहे’, असे उद्गार ह.भ.प. लताप्रसाद तिवारी यांनी काढले.

३. धर्मप्रेमी श्री. पद्माकर नानोटे, निसर्ग सेवा समितीचे श्री. निखिल सातपुते, ‘संस्कृत भारती’चे श्री. अनिल पाखोडे, कविता भांडुपिया यांनीही मनोगत व्यक्त केले.

४. शेवटी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ठराव संमत करण्यात आले.