कल्याण येथे ३ मासांपासून बंद असलेले श्री हनुमंताचे मंदिर अखेर भक्तांसाठी खुले !

कल्याण येथील संत पू. मोडक महाराज यांचे मार्गदर्शन आणि हिंदुत्वनिष्ठांच्या एकजुटीचा परिणाम !

बंद अवस्थेतील श्री हनुमानाची मूर्ती आणि सध्या सर्वांसाठी खुली केलेली हनुमानाची मूर्ती

ठाणे, १३ मे (वार्ता.) – कल्याण (पश्चिम) येथील शिवशाही महाराष्ट्रनगर, शितलानगर परिसरातील बंजारा चाळ येथील श्री हनुमानाचे मंदिर मागील ३ मासांपासून बंद होते. एका महिलेने ते बंद ठेवण्यासाठी दबाव आणला होता. याविषयी कल्याण येथील संत पू. मोडक महाराज यांना समजल्यावर त्यांनी स्थानिक हिंदूंचे प्रबोधन करून मंदिर पुन्हा खुले करण्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर मंदिर सर्व भक्तांसाठी खुले करण्यात आले.

मंदिरातील श्री हनुमानाची मूर्ती कपड्याने बांधून ठेवण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक हिंदुत्वनिष्ठ असंतुष्ट होते. पू. मोडक महाराज यांच्या प्रबोधनानंतर बाजारपेठ पोलिसांना हे मंदिर खुले करण्यासाठी पत्र पाठवण्यात आले. १० मे या दिवशी येथील स्थानिक नागरिक, हिंदुत्वनिष्ठ आणि कल्याण येथील स्वामी समर्थ मठातील गुरुबंधू यांनी मंदिराची स्वच्छता केली. मूर्तीवरील कापड काढले, तसेच मंदिरात पूजा आणि आरती करण्यात आली. आता हे मंदिर सर्वांसाठी खुले झाले आहे.