मथुरेतील शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाची मागणी करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली !

मथुरा (उत्तरप्रदेश) – वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणानंतर मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्याची मागणी करणारी याचिका येथील न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने स्वीकारली. यावर १ जुलै २०२२ या दिवशी सुनावणी होणार आहे. या मागणीसाठी सर्वश्री मनीष यादव, महेंद्र प्रताप सिंह आणि दिनेश शर्मा यांनी वेगवेगळ्या याचिका केल्या होत्या. या सर्व याचिका स्वीकारून न्यायालयाने १ जुलैला सुनावणी ठेवली आहे.


१. याचिकाकर्ता मनीष यादव यांचे अधिवक्ता देवकीनंदन शर्मा यांनी म्हटले की, ईदगाहच्या आतमध्ये असलेला शिलालेख मुसलमान पक्ष हटवण्याची शक्यता आहे. येथील पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. त्यामुळे दोन्ही पक्षकारांच्या उपस्थितीत येथील चित्रीकरण करण्यात यावे आणि सर्व पुरावे गोळा करण्यात यावेत.

२. दुसरे याचिकाकर्ते श्री. महेंद्र सिंह यांनी सांगितले की, यापूर्वी मी २४ फेब्रुवारी २०२१ या दिवशी याचिका प्रविष्ट करून चित्रीकरण करण्याची आणि न्यायालय आयुक्त नेमण्याची मागणी केली होती; मात्र त्यावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे ९ मे २०२२ या दिवशी पुन्हा याचिका केली.

३. शाही ईदगाह मशिदीचे अधिवक्ता तनवीर अहमद यांनी म्हटले की, हिंदु पक्ष गेल्या २ वर्षांपासून विविध प्रकारच्या याचिका करत आहेत; मात्र त्यांतून त्यांना काय सांगायचे आहे, ते त्यांना स्वतःलाच ठाऊक नाही. मथुरेतील हे दोन्ही धर्मस्थळ वेगवेगळे आहेत. त्यामुळे याचे चित्रीकरण करण्याची आवश्यकताच नाही.

४. यापूर्वीच अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद यांच्या संदर्भातील सर्व याचिका येत्या ४ मासांत निकाली लावण्याचा आदेश दिला आहे.

श्रीकृष्णजन्मभूमीवरील मशीद हटवण्याच्या मागणीवर १९ मे या दिवशी येणार निकाल !

अधिवक्ता रंजना अग्निहोत्री यांनी श्रीकृष्णजन्मभूमीच्या १३.३७ एकर भूमीवर   असलेली शाही ईदगाह मशीद हटवून दुसरीकडे स्थलांतरित करण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेवरील सुनावणी ६ मे या दिवशीच पूर्ण झाली आहे.  यावर १९ मे या दिवशी निकाल येणार आहे. या याचिकेत यात म्हटले आहे की, या भूमीच्या परिसरात वर्ष १६६९-७० मध्ये तत्कालीन मोगल बादशाह औरंगजेब याच्या आदेशाने श्रीकृष्णमंदिर पाडून तेथे शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली आहे.