परिणाम भोगायला सिद्ध राहा !

‘नाटो’मध्ये सहभागी होण्याच्या फिनलँडच्या घोषणेनंतर रशियाची धमकी

(‘नाटो’ ही ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना आहे.)

फिनलँडचे राष्ट्रपती सौली नीनिस्टो

मॉस्को (रशिया) – फिनलँड देशाने ‘नाटो’ देशांमध्ये सहभागी होण्याची घोषणा केल्यानंतर रशियाने संताप व्यक्त करत ‘परिणाम भोगायला सिद्ध रहा’ अशी धमकी दिली आहे. फिनलँडची रशियाला लागून जवळपास १ सहस्र ३०० किलोमीटरची सीमारेषा आहे. फिनलँड नेहमी तटस्थ राहिला आहे; मात्र युक्रेन युद्धानंतर फिनलँडनही आता ‘नाटो’मध्ये सहभागी झाल्याने रशियाला संतप्त आला आहे.

१. फिनलँडच्या पंतप्रधान सना मारिन आणि राष्ट्रपती सौली नीनिस्टो यांनी ‘लवकरच ‘नाटो’च्या सदस्यतेसाठी अर्ज प्रविष्ट केला जाईल’, असे म्हटले आहे. ‘नाटो देशांमध्ये सहभागी झाल्यामुळे देशाच्या सुरक्षेत वाढ तर होईलच; पण ‘नाटो’देखील आणखी भक्कम होईल’, असे पंतप्रधान सना मारिन यांनी म्हटले आहे.

२. यावर रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करतांना म्हटले की, फिनलँडने नाटो देशांचे सदस्यत्व घेतले, तर याचे रशिया-फिनलँड यांच्यासमवेतच्या संबंधांवर परिणाम तर होतीलच; पण उत्तर युरोपमध्येही स्थिरता आणि सुरक्षितता यांचे गंभीर प्रश्‍न निर्माण होतील. यामुळे मोठी हानी सहन करावी लागेल. आम्हाला देशाच्या संरक्षणाच्या संदर्भातील संकटाला तोंड देण्यासाठी सैन्य आणि तांत्रिकी स्वरूपातील कठोर पावले उचलण्यास भाग पाडले जात आहे. फिनलँडला रशियाशी युद्ध करण्याची वेळ का आली ? हे इतिहास ठरवेल.