भाववृद्धी होण्यासाठी साधिकेने केलेले प्रयत्न आणि ती अनुभवत असलेली भावस्थिती !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणाऱ्या सौ. अंजली कणगलेकर यांनी भाववृद्धी होण्यासाठी केलेले विविध प्रयत्न पुढे दिले आहेत.

१. साधिकेने भाववृद्धी होण्यासाठी केलेले प्रयत्न  

सौ. अंजली कणगलेकर

अ. ‘रामनाथी आश्रमातील जिन्याच्या पायऱ्या चढतांना आणि उतरतांना ‘या प्रत्येक पायरीला भगवंताचा स्पर्श झाला आहे. अशा चैतन्यमय पायऱ्यांवरून मी चालत आहे’, या विचाराने माझा भाव जागृत होतो.

आ. प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण करतांना ‘भगवंताचा प्रसाद मिळाला आहे’, असे वाटून माझी भावजागृती होते.

२. साधिकेने अनुभवलेली भावस्थिती

२ अ. ‘भूमीला पाय लागत नसून मी हवेत चालत आहे’, असे जाणवणे : गेल्या ७ – ८ मासांपासून चालतांना ‘माझे पाय भूमीला लागत नाहीत. मी हवेत चालत आहे’, असे मला जाणवते. मी पायांत रबरी चपला (स्लीपर्स) घातल्यावरही त्याचा स्पर्श माझ्या पायांना जाणवत नाही. मला पिसासारखे पुष्कळ मऊ जाणवते. मला चालतांना शरिरात एक प्रकारचा हलकेपणा जाणवतो आणि गतीही नेहमीपेक्षा अधिक वाटते.

(‘हे शरिरातील पृथ्वीतत्त्वाचे प्रमाण न्यून झाल्याचे द्योतक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

२ आ. साधकांकडे पहातांना ‘साधक म्हणजे पुढे होणारे संत आहेत’, या विचाराने भाव जागृत होणे : मला सर्वच साधकांप्रती एक प्रकारचे आंतरिक प्रेम जाणवते. त्यांच्यासाठी ‘माझ्याकडून स्थुलातून अधिक काही करणे होते’, असे नाही; मात्र सर्व साधकांकडे पहातांना ‘आपले साधक म्हणजे पुढे होणारे संत आहेत’, असा विचार येऊन माझा भाव जागृत होतो.

२ इ. सेवेतील एकाग्रता वाढून देवच सेवा करवून घेत असल्याचे अनुभवणे : अलीकडे माझी सेवेतील एकाग्रता वाढली आहे. मला सेवा करतांना अनेक सूत्रे आणि सेवेशी संबंधित; पण मला ठाऊक नसलेले बारकावे लक्षात येतात. त्याप्रमाणे कृती केल्यावर माझी सेवा अधिक चांगली होते. अशा वेळी ‘हे स्वतःचे विचार नसून देवच मला विचार सुचवत आहे आणि तोच माझ्याकडून सेवा करवून घेत आहे’, याची मला जाणीव असते. त्या वेळी मी कृतज्ञताभावात असते. अनेक वेळा माझ्याकडून माझ्या शेजारी स्थुलातून भगवंतासाठी आसंदी ठेवली जाते. ‘भगवंत तेथे बसून मला सांगत आहे’, असे अनुभवत माझ्याकडून सेवा होते.

२ ई. भोजनकक्षात बसल्यावर सर्वत्र चैतन्य जाणवणे आणि हळूहळू स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव न रहाणे आणि ‘आत खोल शांतीच्या गर्तेत जात आहे’, असे जाणवणे : ११.१.२०२१ या दिवशी सकाळी भोजनकक्षात प्रसाद (न्याहरी) घेऊन झाल्यावर माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. त्यानंतर काही क्षण ‘मला तेथेच बसून रहावे’, असे वाटल्याने मी तशीच बसून राहिले. त्या वेळी मी भोजनकक्षात सर्वत्र पहात होते. मला साधक इकडे-तिकडे जातांना दिसत होते; मात्र ‘ते कोण आहेत ?’, याची मला जाणीव नव्हती. मला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव न होता ‘केवळ चैतन्य शेष राहिले आहे’, असे वाटले. ‘साधकांच्या जागीही चैतन्यच उरले आहे आणि सगळे चैतन्य एक झाले आहे’, असे मला जाणवले. मला हळूहळू सृष्टीतील सगळे चलन-वलन जाणवू लागले. त्यातही सर्वत्र केवळ चैतन्याची जाणीव भरून राहिली होती. त्या वेळी भोजनकक्षात बसलेला माझा देह, चैतन्यमय देह, हे सर्व पहात असलेला देह आणि सर्वच चैतन्यमय असल्याचे अनुभवणारी ‘मी’ असे वेगवेगळ्या जाणिवेच्या स्तरांवर स्वतःकडे पहाणे झाले. तेव्हा माझ्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. सतत याच स्थितीत रहाता येण्यासाठीची जिवाची व्याकुळता वाढली आणि अशा स्थितीत सतत राहून प्रत्येक कृती करता येण्यासाठी माझ्याकडून प्रार्थना झाली. ‘खोल शांतीच्या गर्तेत मी जात आहे’, असे मला जाणवले. यात ‘किती वेळ गेला ?’, याचे मला भान राहिले नाही. अनुमाने २० – २५ मिनिटांनी मी भानावर आले. त्या वेळी ‘माझ्या डोळ्यांतून अश्रूधारा वहात होत्या आणि मी हात जोडून बसले होते’, असे माझ्या लक्षात आले.

२ उ. ताटात सरबताचे पेले ठेवतांना गोपी आणि कृष्ण यांच्या स्मरणाने भाव जागृत होणे अन् सेवा करतांनाच भगवंताच्या भेटीसाठी जिवाची व्याकुळता वाढून डोळ्यांतून भावाश्रू येणे : माझ्याकडे साधकांसाठी सरबत बनवण्याची सेवा असते. एकदा मी नेहमीप्रमाणे ही सेवा करण्यासाठी उठले. त्या वेळी अकस्मात् माझ्या मनात एक प्रकारचे प्रेम उचंबळून येत असल्याचे मला जाणवले. मला पुष्कळ उत्साही वाटू लागले आणि मला हलकेपणाही जाणवला. मी सरबत बनवले. नंतर पेले आणून ते ताटात पुसून ठेवतांना ‘एकेक पेला म्हणजे एकेक गोपी आणि मध्यभागी ठेवलेला पेला म्हणजे श्रीकृष्ण आहे’, असा भाव ठेवला. मी मध्यभागी एक पेला पालथा ठेवला आणि त्याच्या सभोवतीच्या पालथ्या घातलेल्या एकेका पेल्यावर पुढचा दुसरा पेला ठेवू लागले. त्या वेळी ‘हे गोविंदा, तू किती लबाड आहेस. सगळ्यांमधे असतोस आणि लपून रहातोस, तसाच येथेही तू आला आहेस; मात्र तू गोपींना दिसत नाहीस’, असे त्याच्याशी बोलणे होऊ लागले. सर्वांत शेवटी मधल्या पालथ्या घातलेल्या पेल्यावर आणखी दोन पेले पालथे ठेवल्यावर तो सर्वांत उंच झाला. त्या वेळी तू गोपींच्या जवळच असतोस; मात्र त्यांना तुझे अस्तित्व उमगू देत नाहीस. ‘साधना करतांना जीव तुझ्या भेटीसाठी व्याकुळ होऊ लागल्यावरच तू त्याला दर्शन देतोस. त्याला जवळ करतोस’, या विचाराने सेवा करतांनाच भगवंताच्या भेटीसाठी जिवाची व्याकुळता वाढून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. मला आनंदही होत होता आणि त्या वेळी व्याकुळताही होती.

‘देवा, अलीकडे ‘प्रत्येक कृतीत तू कसा आहेस !’, हेच तू या जिवाला दाखवतोस आणि मला भावस्थितीत ठेवतोस. त्यासाठी मला वाटत असलेली कृतज्ञता शब्दांत सांगणे केवळ अशक्यच आहे. तूच ती समजून घे देवा !  दुसऱ्या दिवशी साधकांनी कालच्या सरबताची चव नेहमीपेक्षा वेगळी आणि चांगली लागल्याचे सांगितले.

२ ऊ. सहजतेने सर्व कृती होऊन आनंदावस्थेत वाढ झाल्याचे जाणवणे : माझा अनेक वेळा नामजप न होता मी भावस्थिती अनुभवते. माझी दिवसभरात आनंदाची स्थिती टिकण्याचे प्रमाण वाढले असून मनात येणाऱ्या अनावश्यक विचारांचे प्रमाण उणावले आहे. माझ्या मनात अनावश्यक विचार आलाच, तर मला लगेच त्याची जाणीव होते. मला असे विचार पुष्कळ त्रासदायक वाटतात. मला अनेक वेळा अस्वस्थ करणाऱ्या कणांची शरिरात हालचाल होतांना जाणवते आणि ते नकोसे वाटते; मात्र याचा अवधी पूर्वीपेक्षा उणावला असून काही क्षणांत मी पुन्हा आनंदाच्या स्थितीत किंवा भावावस्थेत असते. ‘माझ्याकडून यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतात’, असे नाही. मला हे सर्व सहजतेने होत असल्याचे अनुभवायला येते. हे केवळ तुझ्या कृपेनेच शक्य आहे देवा !’

– सौ. अंजली कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.३.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक