बिहारमधील नोंदणीकृत मंदिरांच्या पुजार्‍यांना मानधन द्यावे ! – बिहारचे कायदामंत्री प्रमोद कुमार यांची मागणी

बिहारचे कायदामंत्री प्रमोद कुमार

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारमधील नोंदणीकृत मंदिरांच्या पुजार्‍यांना मानधन देण्यात यावे, अशी मागणी राज्याचे कायदामंत्री प्रमोद कुमार यांनी केली. राज्यात सध्या मशिदींमध्ये त्यांच्या व्यवस्थापनाकडून मौलवी आणि अजान देणार्‍यांना प्रतिमहा ५ सहस्र ते १८ सहस्र रुपये वेतन देण्यात येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ही मागणी केली. भाजपचे आमदार हरिभूषण ठाकुर बचौल यांनी या मागणीचे समर्थन केले आहे.

प्रमोद कुमार म्हणाले की, राज्याच्या धार्मिक न्यास मंडळाकडे ४ सहस्र मंदिरांची नोंदणी आहे आणि तितकेच अर्ज प्रलंबित आहेत. सरकारकडून या मंदिरांतील पुजार्‍यांना मानधन देण्याची व्यवस्था नाही. मंदिरांच्या पुजार्‍यांना वेतन देण्याचा निर्णय मंदिराचे संचलन करणार्‍या समितीवर अवलंबून आहे. त्यांना मिळणार्‍या उत्पन्नावर वेतन देण्याची रक्कम ठरवता येऊ शकते. हे वेतन ते दैनिक किंवा मासिक स्तरावर देऊ शकतात.