कोल्हापूर, ११ मे (वार्ता.) – विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी श्री महालक्ष्मी मंदिराला भेट देऊन मंदिर आणि परिसर यांची पहाणी केली. या वेळी त्यांनी मंदिरातील संगमरवरी फरशा काढण्याच्या कामाविषयी माहिती घेऊन गळतीसंबंधी काही समस्या असल्याविषयी विचारणा केली. पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेच्या समस्या यांविषयी जाणून घेतले. ही सर्व माहिती घेतल्यावर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘श्री अंबाबाई विकास आराखड्याच्या संदर्भात तो पूर्ण होण्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू’, असे आश्वासन दिले.
या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दळववळणबंदी काळात मंदिरात केलेल्या उपाययोजना आणि चालू असलेली विकासकामे या संदर्भात माहिती दिली. या वेळी करवीर तहसीलदार श्रीमती भामरे-मुळे, पन्हाळा नायब तहसीलदार विनय कौलवकर, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.