सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) आणि दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) यांच्या दैवी बाललीलांचे अनुभवलेले अनमोल क्षणमोती !

पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) आणि पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे)

१०.४.२०२२ या दिवशी श्रीरामनवमी होती. त्या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) आणि पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) बराच वेळ एकत्र होते. त्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि पू. भार्गवराम अन् पू. वामन यांच्यातील शब्दांच्या पलीकडील दैवी संवाद पुढे दिला आहे. दोन बालसंतांचे सहजावस्थेतील वागणे, एकमेकांविषयीची प्रीती, भाव, एकमेकांचे कौतुक हे सर्वच अवर्णनीय आहे. आम्ही अनुभवलेले शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी ‘याच्या पुष्कळ पलीकडील आणि दैवी घटना सूक्ष्मातून तिथे घडल्या असतील. देवालाही या दोघांना असे बघण्याचा मोह आवरता आला नसेल’, असेच आम्हाला वाटते.

१. सौ. मानसी राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, पू. वामन यांची आई) आणि सौ. भवानी प्रभु (पू. भार्गवराम यांची आई) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सौ. मानसी राजंदेकर

१ अ. यज्ञस्थळी केलेल्या प्रभु श्रीरामाच्या पूजेचे भावपूर्ण दर्शन घेणे आणि नमस्कार करणे : १०.४.२०२२ या दिवशी मी (सौ. मानसी) पू. वामन यांना घेऊन रामनाथी आश्रमात गेले. त्या वेळी ‘पू. वामन आणि पू. भार्गवराम यांना खाली स्वागतकक्षाजवळच घेऊन बसूया’, असा विचार देवानेच माझ्या मनात घातला. ते दोघे भेटल्यावर त्यांनी पू. वामन यांची बहीण कु. श्रिया (कु. श्रिया राजंदेकर, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ११ वर्षे) हिला समवेत घेऊन यज्ञस्थळी केलेल्या प्रभु श्रीरामाच्या पूजेचे भावपूर्ण दर्शन घेतले आणि नमस्कार केला. ही कृती करण्याविषयी आम्ही त्यांना काहीच सांगितले नव्हते. त्यांनी इतका भावपूर्ण नमस्कार केला की, ते बघून आमचीही भावजागृती झाली.

१ आ. पू. भार्गवराम प्रभु आणि पू. वामन राजंदेकर यांना स्वागतकक्षाजवळ आसंदीवर घेऊन बसल्यावर जाणवलेली सूत्रे  

१. त्या वेळी त्यांच्याजवळ कोणतेच खेळणे अथवा खेळण्यासाठी काही साधन नव्हते किंवा तिथे फार कोणी साधकसुद्धा नव्हते. त्यामुळे ते दोघेही एकमेकांना अनुभवत असल्याचे जाणवले.

२. त्यांना एकमेकांची भाषा (पू. वामन यांना कन्नड आणि पू. भार्गवराम यांना मराठी) कळत नसली, तरी ‘त्या कालावधीत त्यांच्यात होणारा संवाद हा शब्दांच्या पलीकडचा होता’, असे आम्हाला जाणवत होते.

३. त्यांच्याकडे बघून ‘त्यांना एकमेकांशी प्रत्यक्ष बोलण्याची काही आवश्यकता नाही’, असे जाणवत होते.

४. ते दोघेही एकमेकांच्या सत्संगात पुष्कळ आनंदी होते. त्यांच्या आनंदाच्या लहरीचे प्रक्षेपण दूरवर होत होते.

१ इ. पू. भार्गवराम यांना पू. वामन यांनी केलेल्या कृती आणि बोलणे यांचे पुष्कळच कौतुक वाटणे : पू. भार्गवराम यांच्यात पू. वामन यांच्याप्रती पुष्कळ प्रीती आहे. ते नेहमी पू. वामन यांची प्रेमाने काळजी घेतात. पू. भार्गवराम यांना पू. वामन यांनी केलेल्या कृती आणि बोलणे यांचे पुष्कळच कौतुक वाटते अन् ते त्या त्या वेळी त्यांचा आनंदी तोंडवळा आणि बोलणे यांतून व्यक्त होत असते.

१ ई. पू. वामन यांची पू. भार्गवराम यांच्यावर असलेली प्रीती ! : या वेळी पू. वामन पू. भार्गवराम यांचे वेगवेगळ्या प्रकारे लाड करत होते. कधी ते त्यांना मिठी मारायचे, कधी त्यांचा हात धरायचे, तर कधी पू. भार्गवराम यांच्या गालांवरून हात फिरवायचे. पू. वामन यांनी पू. भार्गवराम यांची पापी घेतली. त्या वेळी पू. वामन इतके हळूवार आणि प्रेमाने त्यांच्याजवळ जात होते की, ते बघूनच आमची भावजागृती होत होती.

१ उ. पू. भार्गवराम यांच्याजवळ गेल्यावर पू. वामन यांना शिवाचा नाद ऐकू येणे : पू. वामन म्हणाले, ‘‘पू. भार्गवरामदादांच्या जवळ गेल्यावर मला शिवाचा नाद ऐकू येतो. (या संदर्भात पू. भार्गवराम यांच्या आई सौ. भवानीताई यांनी सांगितले की, मागील २ – ३ दिवस पू. भार्गवराम ‘ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप करत आहेत.)

सौ. भवानी भरत प्रभु

१ ऊ. पू. वामन यांच्याजवळ गेल्यावर पू. भार्गवराम यांना ‘ते ईश्वरच आहेत’ अशी अनुभूती येणे : पू. वामन पू. भार्गवराम यांचे पुष्कळ लाड करत होते. त्या वेळी पू. भार्गवराम मला (सौ. मानसी) म्हणाले, ‘‘त्यांना माझे लाड करू दे ! तसे करून त्यांना किती आनंद मिळतो ना ! ते जवळ आल्यावर ‘ते ईश्वरच आहेत’, असे मला वाटते.’’ ते दोघेही एकमेकांना ईश्वरस्वरूपच मानतात. त्यामुळे त्यांना परस्परांविषयी अनुभूती येते.

१ ए. पू. भार्गवराम आणि पू. वामन यांनी ५ मिनिटे ‘ॐ नमः शिवाय ।’ आणि ‘ॐ’ असा नामजप केला. त्या वेळी ‘ते बाह्यता वेगळे वाटत असले, तरी अंतर्मनातून एकच आहेत’, असे आम्हाला जाणवले आणि वातावरणात गारवा जाणवला.

१ ऐ. बालसंतद्वयी समवेत असतांना ‘त्यांच्या बाललीला बघायला देवताही आल्या आहेत’, असे आम्हालाजाणवणे : ‘दोन्ही बालसंतांनी एकत्र असणे’, हे देवाचेच नियोजन होते. ‘ते समवेत असतांना त्यांचे हसणे, बोलणे आणि खेळणे या सर्व बाललीला बघायला देवताही आल्या आहेत’, असे आम्हाला जाणवत होते. एका वेगळ्याच लोकातील वातावरण तिथे निर्माण झाले होते.

२. बालसंतद्वयींविषयी पू. वामन यांची बहीण कु. श्रिया राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के आणि वय ११ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

कु. श्रिया राजंदेकर

अ. पू. भार्गवराम आणि पू. वामन यांचा हात धरून आश्रमात चालत असतांना ‘त्या दोघांमध्येही समान रूपाने प्रभु श्रीरामाचे तत्त्व आहे’, असे मला जाणवले.

आ. मी ‘प्रभु श्रीरामाच्या बालरूपाच्या समवेत हात धरून चालत श्रीरामाच्या दर्शनाला जात आहे’, असे मला जाणवत होते. म्हणजे ‘श्रीरामच मला त्याच्या दर्शनासाठी घेऊन जात आहे’, असे मला जाणवत होते.

इ. त्यांच्या समवेत असतांना माझे मन पूर्णपणे स्थिर होते.

३. पू. भार्गवराम यांच्या आजी श्रीमती अश्विनी प्रभु (वय ५६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांना पू. भार्गवराम आणि पू. वामन यांची छायाचित्रे पाहिल्यावर जाणवलेली सूत्रे

श्रीमती अश्विनी प्रभु

अ. ‘ते दोघेही एकमेकांच्या सत्संगाचा आनंद घेत आहेत’, असे मला जाणवले.

आ. ‘दोघेही बालसंत समोर बघून भावपूर्ण नमस्कार करत आहेत’, हे बघितल्यावर वाटले की, त्यांच्या समोर साक्षात् प.पू. गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) उभे आहेत.

इ. पू. वामन पू. भार्गवराम यांच्या जवळ जाऊन त्यांचे लाड करत असतांना ‘पू. भार्गवराम पू. वामन यांचे प्रेम अनुभवत आहेत’, असे मला जाणवले.

ई. पू. भार्गवराम आणि पू. वामन यांचे नामजप करतांनाचे छायाचित्र बघून वाटले, ‘ते नामजपाचा आनंद अनुभवत आहेत.’ ४. कृतज्ञता : परात्पर गुरु डॉ. आठवले (प.पू. गुरुदेव यांच्या) यांच्या कृपेनेच आम्हाला या बालसंतांचा सत्संग अनुभवायला मिळत आहे. या बालसंतांच्या विविध लीला आम्ही बघू शकतो आणि त्याचा आनंद अनुभवू शकतो. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, त्याबद्दल आम्ही कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. परम पूज्य, केवळ तुम्ही आहात; म्हणून आम्ही या अमूल्य क्षणांची अनुभूती घेऊ शकत आहोत. कोटीशः कृतज्ञता !

(सर्व सूत्राचा दिनांक १०.४.२०२२)