तालिबानने ठार मारलेले भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांना ‘पुलित्झर पुरस्कार’ घोषित

न्यू यॉर्क (अमेरिका) – अफगाणिस्तानमध्ये तालिबानने जुलै २०२१ मध्ये ठार मारलेले भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांना छायाचित्र क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ‘फीचर फोटोग्राफी विभागा’त दानिश यांना यंदाचा ‘पुलित्झर पुरस्कार २०२२’ प्रदान केला जाणार आहे. ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेचे वृत्तछायाचित्रकार दानिश यांच्यासह अदनान अबिदी, साना इशरद माटो आणि अमित दवे या त्यांच्या ३ भारतीय सहकार्‍यांनाही हा बहुमान यंदा देण्यात येणार आहे. ‘पुलित्झर पुरस्कार’ हा छायाचित्र क्षेत्रातील ‘नोबेल पुरस्कार’ म्हणून ओळखला जातो.


भारतातील कोरोना मृतांची दाहकता दाखवणारी छायाचित्रे ही भावनिक जवळीक आणि विध्वंस दाखवणारी असून ही छायाचित्रे पहाणार्‍याला त्या जागेचे महत्त्व अधोरेखित करून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे ‘पुलित्झर’च्या संकेतस्थळावर या छायाचित्रांविषयी सांगण्यात आले आहे.