अफगाणिस्तानात तालिबानच्या विरोधात उठाव : ३ जिल्ह्यांवर विद्रोह्यांचे नियंत्रण

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवटीच्या विरोधात सशस्त्र उठाव करण्यात आला आहे. अहमद मसूद यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या विद्रोह्यांनी ‘राष्ट्रीय प्रतिकार दल’ सिद्ध केले असून हे दल तालिबान्यांवर तुटून पडले आहे. दलाने दावा केला आहे की, त्याने तालिबान्यांच्या विरोधात संघर्ष करत पंजशीर खोर्‍यातील ३ मोठे जिल्हे त्यांच्या तावडीतून मुक्त केले. या जिल्ह्यांत तालिबान्यांनी आत्मसमर्पणासाठी अवधी मागितला असून दलाने केलेल्या आक्रमणात त्यांची मोठी हानी झाली असल्याचा दावाही दलाने केला आहे.

१. विद्रोह्यांचा बीमोड करण्यासाठी तालिबानने आता या भागांत हेलिकॉप्टरद्वारे आक्रमण करण्यास आरंभ केला आहे. या धुमश्‍चक्रीत मसूद यांच्यासमवेत लढणार्‍या विद्रोह्यांनी २० तालिबान्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे.

२. तालिबानने मात्र पंजशीर भागात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे म्हटले. पंजशीरच्या जनतेने मात्र तालिबान्यांना खोटे ठरवत रात्रीच्या वेळी भीषण युद्ध चालू असल्याचे सांगितले.

३. गेल्या वर्षी १५ ऑगस्टला अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता उलथवून टाकत त्यावर नियंत्रण मिळवले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात करण्यात आलेला हा पहिला उठाव मानला जात आहे.