हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…
गोव्याच्या मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसेनानी प्राणपणाने लढले. त्यांपैकी डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा म्हणजेच डॉ. टी.बी. कुन्हा यांना गोमंतकाच्या ‘आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. पोर्तुगीज गेले; पण पोर्तुगीजधार्जिणे गोव्यात अजूनही आहेत. डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे. ९ मे या दिवशी आपण ‘धर्मांतरासाठी राजसत्तेचे पाठबळ मागणारा झेवियर’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील भाग येथे देत आहोत.
‘फक्त सामाजिक आणि लष्करी ताकद वापरल्यानेच धर्मांतर शक्य झाले, केवळ धर्मोपदेशाने नव्हे. (पोर्तुगालचा राजा) डॉन जुआव (३ रा) कट्टर धर्मांध होता. तो धर्मांतराच्या वेळी घडलेल्या अनेक अमानुष अत्याचारांना उत्तरदायी होता. फ्रान्सिस झेवियर त्याचा वैयक्तिक कन्फेसर (पापांची संमती ऐकणारा धर्माेपाध्याय) होता. त्याने डॉन जुआंवला लिहिलेल्या पत्रात खालील उपाय कार्यवाहीत आणण्याबद्दल विनंती केली होती.
आपण असा आदेश द्यावा की, ‘प्रत्येक व्हाईसरॉय आणि गव्हर्नर तुम्हाला लिहितात. त्या वेळी त्यांनी तिथल्या वर्तमान धार्मिक परिस्थितीविषयी, धर्मांतर केलेल्यांची संख्या, त्याची पद्धत, आणखी धर्मांतरे करण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करावा लागेल, हे सगळे विशद करावे; कारण सत्ताधिकाऱ्यांचा वरदहस्त असेल, तरच असंख्य धर्मांतरे होऊ शकतील. त्यांना दिलेले सर्व अधिकार वापरूनसुद्धा धर्मांतरे घडून आली नाहीत, तर अशा अधिकाऱ्यांना उत्तरदायी धरून त्यांना शिक्षा करण्यात येईल, असा राजेसरकारांनी स्पष्ट आदेश द्यावा.
मूर्तीपूजकांना मोठ्या संख्येने धर्मांतरित न केल्यास, आपले हुद्दे आणि मालमत्ता गमवाव्या लागतील, या भीतीची व्हाईसरॉयला अन् गव्हर्नरला सतत जाणीव असली पाहिजे. त्याखेरीज भारतात धर्माेपदेश फारसा फलदायी ठरेल, अशी अपेक्षा राजेसरकारांनी बाळगू नये. तसेच अधिक लोक बाप्टीझम् घ्यायला येतील किंवा आधी घेतलेले फारशी प्रगती करतील, अशीही अपेक्षा बाळगू नये.’
(साभार – ‘गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास’ (पृष्ठ क्र. ३०) मूळ इंग्रजी लेखक : डॉ. टी.बी. कुन्हा, अनुवादक : प्रफुल्ल गायतोंडे)