सरकारी यंत्रणेतील लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून प्रतिवर्षी जनतेच्या कोट्यवधी रुपयांची लूट !

१२ वर्षांत १२ सहस्र ५९० (प्रत्येक दिवशी ३) लाचखोरीची प्रकरणे उघड !

‘वर्ष २०१० ते २०२१ या १२ वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवायांमध्ये महाराष्ट्रातील विविध सरकारी खात्यांमध्ये एकूण १२ सहस्र ५९० लाचखोरीची प्रकरणे उघड झाली आहेत. जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या सरकारी नोकरांनी या कालावधीत सर्वसामान्यांकडे २४ कोटी २८ लाख ७० सहस्र ५९१ रुपयांची लाच मागितली. नागरिकांनी केलेल्या तक्रारींमुळे या कारवाया उघड झाल्या आहेत; मात्र जे नागरिक तक्रारी करत नाहीत, अशा कितीतरी प्रकरणात हे सरकारी ‘बाबू’ जनतेकडून कोट्यवधी रुपये उकळत आहेत. ती प्रकरणे पुढे येत नाहीत. सध्या सरकारी यंत्रणाच सर्वसामान्यांची लूट करत आहेत. मागील अनेक वर्षे लाचलुचपत विभागाकडून लाचखोरांवर कारवाई करण्यात येत आहे; मात्र सरकारी यंत्रणांतील लाचखोरीच्या प्रमाणाला आळा न बसता दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच आहे. सरकारी खात्यांतील १-२ नव्हे, तर जवळपास सर्वच सरकारी खात्यांमध्ये लाचखोरी बोकाळली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आरोग्य विभाग आणि शिक्षणासारखे क्षेत्रही यातून सुटलेले नाही.