प्रतापगड (जिल्हा सातारा) – अफझलखान याला मोठ्या हिमतीने जावळीच्या खोर्यात आणून छत्रपती शिवरायांनी त्याला समूळ नष्ट केले. हा पराक्रम नसून शिवछत्रपतींचा अद्वितीय कल्पक पुरुषार्थच म्हणावा लागेल. यातून शिकवण घेऊन आपल्या नित्य व्यवहारात येणार्या लहान-मोठ्या प्रत्येक संकटाला आपण बुद्धीकौशल्याने सामोरे गेले पाहिजे. जीवन निष्कलंक करायला शिकण्यासाठी या जावळीच्या खोर्यात येऊन प्रत्येक शिवभक्ताने किल्ले प्रतापगडचे ‘मंत्रयुद्ध’ आत्मसात केले पाहिजे, असे आवाहन शिवचरित्राचे अभ्यासक डॉ. संदीप महिंद गुरुजी यांनी किल्ले प्रतापगड येथे आयोजित करण्यात आलेल्या दुर्गाभ्यास शिबिरामध्ये केले.
डॉ. संदीप महिंद गुरुजी पुढे म्हणाले, अफजल खान अनुमाने २२ सहस्त्र सैन्य आणि प्रचंड साधनसामग्री घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. अशा प्रसंगात कोणत्याही सहकार्याचे अवसान गळू न देता छत्रपती शिवाजी महाराजांनी कौशल्याने प्रत्येक मावळ्याला संकटाचा सामना करण्यासाठी सिद्ध केले. सह्याद्रीच्या मुशीतील सामान्य माणसांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न टिकवण्यासाठी असामान्य शौर्य दाखवले. तसेच आतंकवाद संपवण्याचा आदर्श वस्तूपाठ आपल्यासमोर घालून दिला. त्यांनी ठणकावून सांगितले, ‘जीवनात अनेक संकटे येतात, ती आपली परीक्षा पाहण्यासाठी नाही, तर आपल्यातील पुरुषार्थाला जागवण्यासाठी’ छत्रपती शिवाजी महाराजांचे दैदीप्यमान चरित्र केवळ ऐकून, वाचून, पाहून काहीही होत नाही. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जिजाऊ विद्यापीठात त्याचा व्यवहारिक साक्षात्कार अनुभवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.