‘टोरेस’ आस्थापनातील तिघांना अटक !
मुंबई – ३ लाख मुंबईकरांची अब्जावधी रुपयांची फसवणूक करणार्या ‘टोरेस’ आस्थापनातील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या दादरच्या कार्यालयातून रक्कम आणि दागिने घेऊन तिघे पळून जात होते. उझबेकिस्तानची रहिवासी असलेली आस्थापनाची महाप्रबंधक तानिया कसातोवा, संचालक सर्वेश अशोक सुर्वे आणि रशियाची नागरिक असलेली स्टोअर प्रबंधक व्हॅलेंटिना गणेश कुमार अशी त्यांची नावे आहेत.
संपादकीय भूमिका : गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिल्यास अशा प्रकारांना आळा बसेल, अन्यथा फसव्या आस्थापनांचा सुळसुळाट थांबणार नाही !
अर्धवट जळलेल्या मृतदेहाचे तुकडे कुत्र्यांनी खाल्ल्याचा आरोप !
पुणे – नवी पेठ परिसरातील स्मशानभूमीत मानवी मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी पळवून खाल्ले. मृतदेह अर्धवट जळल्याने असे झाल्याचे महापालिकेचे माजी सदस्य अभिजित बारवकर यांनी म्हटले. या घटनेला उत्तरदायी असणार्या संबंधितांवर कारवाईची मागणी केली जात आहे. पालिकेचे विद्युत् विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर यांनी हे तुकडे मानवी मृतदेहाचे नसून नारळ अथवा पावाचे असल्याचे सांगितले. पुणे महापालिकेने ‘निकिता बॉयलर’ आस्थापनाला वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्याचे कंत्राट दिले आहे.
अमरावती विद्यापीठ परिसरात वाघ !
अमरावती – येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात रात्री इंग्रजी विभागाच्या इमारतीलगत वाघ दिसला. त्यामुळे तेथे पहाटे फिरायला येणार्यांना सावधगिरीच्या दृष्टीने प्रवेश नाकारण्यात आला.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू !
पुणे – डॉ. प्रणाली दाते (वय ३४ वर्षे) या दुपारी १२.३० वाजता उंड्रीकडून हांडेवाडीच्या दिशेने जात असतांना मागून येणार्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. त्या रस्त्यावर पडल्यावर त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक पांडुरंग भोसले (वय ३५ वर्षे) याने घटनास्थळावरून पलायन केले; मात्र त्याला सी.सी.टी.व्ही.च्या आधारे शोधून त्याला अटक करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील १३ अनधिकृत शाळांची नावे घोषित !
पुणे – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने १३ अनधिकृत शाळांची नावे घोषित केली आहेत. ‘या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये’, असे आवाहनही करण्यात आले आहे. या शाळा चालू ठेवल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाईची चेतावणी प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली. जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.