सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमधून शासनाच्या जादूटोणाविरोधी कायद्याविषयी व्याख्याने आयोजि करण्यास अनुमती

सिंधुदुर्ग – विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणाविरोधी कायद्याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात यावे आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग या संस्थेला सहकार्य करावे, असा आदेश शिक्षणाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका गटशिक्षणाधिकारी, तसेच प्राचार्य, मुख्याध्यापक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा यांना काढल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

या कायद्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जादूटोणाविरोधी कायदा प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थापन झाली. या समितीचे सचिव तथा साहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग यांनी माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना या कायद्याविषयी जनजागृती, प्रसार-प्रचार होण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये येथे व्याख्याने आयोजित करावीत, असे आदेश दिले होते. या आदेशाच्या अनुषंगाने तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौघुले यांनी सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, माध्यमिक शाळा यांना सर्व शाळांमध्ये या कायद्याविषयी व्याख्यान आयोजित करण्याचे पत्र दिले होते; मात्र मागील वर्षभरात अशी व्याख्याने आयोजित करण्यासाठी म्हणावा तसा प्रतिसाद शाळांकडून मिळाला नव्हता. ही गोष्ट अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी एका निवेदनाद्वारे माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर आता व्याख्याने आयोजित करण्याविषयी नव्याने आदेश देण्यात आले आहेत. यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शिक्षणाधिकार्‍यांचे आभार मानण्यात आले. अशी व्याख्याने आयोजित करण्यासाठी विजय चौकेकर यांच्याशी (९४२०९७ ४७७५) संपर्क करावा. या व्याख्यानात कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा समस्या निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊन, तसेच कोणतेही मानधन न घेता हे व्याख्यान देण्यात येईल, असे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष राजीव बिले, सचिव अजित कानशिडे आणि जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी म्हटल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदु धर्मातील परंपरा आणि शास्त्र यांविरोधी वक्तव्ये होणार नाहीत, असे शाळा व्यवस्थापकांनी पहावे !