सांगली येथील ‘हिंदू गर्जना सभे’त हिंदूंच्या संघटितपणाचा आविष्कार !
सांगली, १० जानेवारी (वार्ता.) – हिंदूबहुल देशात हिंदूंचा धाक असलाच पाहिजे, तसेच हिंदूंमध्ये प्रखरता असलीच पाहिजे. कोणत्याही व्यवसायाच्या माध्यमातून चलनवलन होणारा पैसा हा कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राच्या विरोधात, तसेच ‘जिहाद’ करण्यासाठी वापरला जाऊ नये. त्यासाठी हिंदूंना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि सुरक्षित ठेवणे, हीच आमची प्राथमिकता आहे, असे ठाम मत राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री श्री. नितेश राणे यांनी व्यक्त केले. ते मराठा सेवा संघाच्या सभागृहात हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने आयोजित ‘हिंदू गर्जना सभे’त बोलत होते. या सभेसाठी सांगली, कोल्हापूर, कराड या ठिकाणांहून मोठ्या संख्येने हिंदू उपस्थित होते.
या प्रसंगी व्यासपिठावर हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे, मिरज येथील भाजपचे आमदार डॉ. सुरेश खाडे, शिराळा येथील भाजपचे आमदार श्री. सत्यजित देशमुख, ‘हिंदु व्यावसायिक संघ संकल्पने’चे श्री. श्रीरंग केळकर, सौ. नीता केळकर, प्रा. नंदकुमार बापट, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी माजी नगरसेविका सौ. स्वाती शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावर ‘उरूस’ होऊ देणार नाही ! – नितेश राणेविशाळगड आता खुला करण्यात आला असून काही लोक तेथे उरूस (मुसलमानांचा धार्मिक उत्सव) आयोजित करणार आहेत, असे काही लोकांनी मला सांगितले. राज्यात सध्या हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावर उरूस होऊ देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक मावळा म्हणून गड-दुर्ग सुरक्षित ठेवणे, हे माझेही दायित्व आहे. |
मी हिंदु मतदारांमुळेच आमदार झालो ! – नितेश राणे
मी आता तिसर्यांदा आमदार म्हणून निवडून आलो असून मी ‘हिंदूंच्या मतांवरच आमदार झालो’, असे उघडपणे सांगतो. प्रत्येक वेळी माझ्या मताधिक्यात वाढच झाली. आपली भूमिका ही नेहमी स्पष्ट आणि ठाम असली पाहिजे.
इलेक्ट्रॉनिक मशीन तथा ‘इ.व्ही.एम्.’चा अर्थ सांगतांना श्री. नितेश राणे म्हणाले, ‘‘इ.व्ही.एम्.’ म्हणजे ‘एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’, असे होते. त्यामुळे हिंदूंनी बहुसंख्येने मतदान केले.’’
आपण हिंदु राष्ट्राच्या दिशेने प्रवास करत आहोत ! – डॉ. सुरेश खाडे, आमदार, भाजप
मिरजसारख्या ठिकाणी मी चौथ्यांदा आमदार झालो आहे. आम्ही कोणत्याही जातीचे असलो, तरी आम्ही प्रथम हिंदु आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशाची घौडदौड चालू आहे. त्यामुळे आपण हिंदु राष्ट्राच्या दिशेने प्रवास करत आहोत, याची निश्चिती सर्वांना आता आली असेल.
मंत्री नितेश राणे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ ग्रंथ भेट !या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी मंत्री श्री. नितेश राणे यांना ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, हा ग्रंथ भेट दिला. |
या कार्यक्रमाच्या अगोदर हिंदु व्यावसायिक संघाच्या पुढाकाराने ‘चेतना हॉल’ इथे आयोजित करण्यात आलेल्या व्यवसाय प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यात गृहपयोगी वस्तू, कपडे, खेळणी, दागिने, सौंदर्य प्रसाधने इत्यादी वस्तूंचे कक्ष लावण्यात आले आहेत. हे प्रदर्शन १२ जानेवारीपर्यंत खुले असणार आहे. |
विशेष
१. या प्रसंगी प्रा. नंदकुमार बापट यांनी ‘हिंदु व्यावसायिक संघा’च्या स्थापनेची भूमिका स्पष्ट केली.
२. या प्रसंगी हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे श्री. नितीन काकडे यांनी मंत्री श्री. नितेश राणे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेली चांदीची चौकट भेट दिली.