Steve Jobs’ Wife To Attend Kumbh : ‘अ‍ॅपल’चे दिवंगत संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी महाकुंभमेळ्यात सहभागी होणार !

१७ दिवस संन्याशासारखे जीवन व्यतीत करणार

लॉरेन पॉवेल जॉब्स

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ‘ॲपल’ या जगप्रसिद्ध आस्थापनाचे दिवंगत संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स या हिंदू धर्माच्या परंपरेने आकर्षित होऊन महाकुंभमेळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्या निरंजनी आखाड्यात सुमारे १७ दिवस राहणार आहेत. त्या १३ जानेवारी या दिवशी येथे पोचतील आणि ३१ जानेवारीपर्यंत ते महाकुंभाच्या ठिकाणी वास्तव्य करणार आहेत.

स्टीव्ह जॉब्स यांना हिंदू आणि बौद्ध धर्मात खूप रस होता. त्यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स यांनी तोच मार्ग अवलंबला आहे. लॉरेन पॉवेल जॉब्स कॅलिफोर्नियातील पालो अल्टो येथे राहतात.

स्टीव्ह जॉब्स आणि पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स

१. लॉरेन पॉवेल जॉब्स या ‘एमर्सन कलेक्टिव्ह’च्या संस्थापिका आणि अध्यक्ष आहेत. जगप्रसिद्ध ॲपलच्या मालकांपैकी त्या एक आहेत.

२. लॉरेन पॉवेल जॉब्स कल्पवासात रहाणार आहेत. ही हिंदु परंपरेतील एक प्राचीन प्रथा आहे, जी पौष पौर्णिमा ते माघी पौर्णिमा या महिन्यात ‘कल्पवासी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या भाविकांकडून पाळली जाते. या काळात कल्पवासी प्रतिदिन गंगेत स्नान करतात. कल्पवासाच्या काळात हे लोक भिक्षूंसारखी साधी आणि कठोर जीवनशैली आत्मसात करतात आणि आध्यात्मिक विकासावर लक्ष केंद्रित करतात.

संपादकीय भूमिका

विदेशी हिंदू धर्माची परंपरा आणि उत्सव या मध्ये रस दाखवतात; मात्र भारतातील जन्महिंदु हिंदू धर्मावर टीका करतात, हे संतापजनक !