सावंतवाडी – तालुक्यातील नाणोस गावात एका खाण आस्थापनाने ग्रामपंचायतीला लेखी पत्र न देता अवैधरित्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे काम चालू केले आहे. हे काम त्वरित बंद होण्यासाठी प्रजासत्ताकदिनी म्हणजे २६ जानेवारीला जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर उपोषण करणार असल्याची चेतावणी ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर यांनी दिली आहे. (या प्रकरणी चौकशी करून अवैधरित्या काम केले जात असेल, तर संबंधितांवर कारवाई केली पाहिजे, अन्यथा जिल्हा प्रशासनाचा अवैध कामाला पाठिंबा आहे, असा त्याचा अर्थ होईल ! – संपादक)
नाणोस गावातील डोंगराळ भागात एका खाण आस्थापनाने ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांना विश्वासात न घेता हे काम चालू केले आहे. याच्या विरोधात २३ डिसेंबर २०२४ या दिवशी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले; मात्र याची नोंद घेऊन जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. एकीकडे जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणायचे आणि दुसरीकडे खाण उद्योग आणून जिल्ह्यातील अनेक गावे उद्ध्वस्त करायची, अशी भूमिका जर सरकारची असले, तर हे थांबले पाहिजे. जिल्हावासियांना शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकास हवा आहे; पण असे न होता सरकार प्रदूषणकारी प्रकल्प लोकांच्या माथी मारत आहे. एखादे आस्थापन ग्रामपंचायतीला कोणतीही कल्पना न देता गावात सर्वेक्षण करत असेल, तर ही गंभीर गोष्ट आहे. अशा प्रकरणात संबंधित आस्थापन आणि जिल्हा खनिकर्म विभाग यांच्याकडून ग्रामपंचायतीला लेखी पत्र मिळणे आवश्यक असतांना तसे जिल्हा प्रशासनाकडून होत नाही. संबंधित विभागात चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे दिली जात नाही, असा आरोप नाणोसकर यांनी
केला आहे.