फरिदाबाद (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘बालक-पालक परिचय सोहळ्या’चे आयोजन

फरिदाबाद (हरियाणा) – सनातन संस्थेच्या वतीने येथील सेक्टर २९ मधील श्री सनातन धर्म मंदिर येथे नुकताच ‘बालक-पालक परिचय सोहळा’ पार पडला. या कार्यक्रमात सनातन संस्थेने आयोजित केलेल्या बालसंस्कार वर्गात शिकवले जाणारे श्लोक, प्रेरणादायी कथा आणि आध्यात्मिक खेळ मुलांनी मोठ्या उत्साहाने सादर केले. या वेळी सनातनच्या बालसंस्कार वर्गात मुले सहभागी झाल्यापासून मुलांमध्ये झालेले सकारात्मक पालट त्यांच्या पालकांनी सांगितले. ‘आपल्या मुलांना पुष्कळ चांगले संस्कार मिळत आहेत’, हे बघून त्यांच्या पालकांना फार आनंद वाटला. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची ‘ऑनलाईन’ वंदनीय उपस्थिती लाभली. सनातन संस्थेच्या सरोज गुप्ता यांनी ‘सनातन संस्थेचे कार्य आणि आजच्या काळात बालसंस्कार वर्गाचे महत्त्व’, यांविषयी , तर सौ. तृप्ती जोशी यांनी ‘मुलांना संस्कारक्षम बनवण्यासाठी पालकांची भूमिका काय असावी ?’, याविषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमामध्ये अनेक पालक आणि मुले उत्साहाने सहभागी झाले.
क्षणचित्रे
१. श्री सनातन धर्म मंदिराचे विश्वस्त श्री. श्यामसुंदर बागला यांना हा कार्यक्रम पुष्कळ आवडला. त्यांनी ‘भविष्यातही असे कार्यक्रम आयोजित करता येतील’, असे सांगितले.
२. एका मुलाच्या आजीने सांगितले, ‘त्यांना या कार्यक्रमाला यायचे नव्हते; पण त्यांना हा कार्यक्रम पुष्कळ आवडला. त्या या कार्यक्रमाला आल्या नसत्या, तर त्यांना एका चांगल्या कार्यक्रमापासून वंचित रहावे लागले असते.’