तासगाव (जिल्हा सांगली) – सध्या सामाजिक माध्यमांचे जाळे प्रचंड वाढले आहे. तरुणाई यात भरकटत चालली आहे; मात्र तरुणांना मेंदूला खुराक मिळेल, असे वाचायला दिल्यास वृत्तपत्रांचे स्थान कायम अबाधित राहील. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. समाजाच्या उणिवा दूर करण्याचे काम पत्रकार करतात. निकोप समाज आणि लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकाराची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले. ते तासगाव येथे मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, प्राचार्य बी.एम्. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पत्रकार सभासदांना १ लाख रुपयांच्या अपघाती विमा पॉलिसीचे वितरण करण्यात आले. पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णु जमदाडे म्हणाले, ‘‘पत्रकारिता क्षेत्र अतिशय धावपळीचे आणि दगदगीचे झाले आहे. त्यामुळे समाजासाठी झटणार्या तालुक्यातील पत्रकारांना विमा संरक्षण असावे, यासाठी संघटनेच्या पुढाकाराने प्रतिवर्षी सर्व सभासदांना विमा पॉलिसी देण्यात येत आहे.’’ प्रास्ताविक संजय माळी यांनी केले. या वेळी अजय जाधव, प्रशांत सावंत, विनायक कदम, गजानन पाटील, योगिता माने यांसह अन्य उपस्थित होते.
पत्रकारांसाठी घरकुल आणि निवृत्तीवेतनाचा प्रश्न मार्गी लावू ! – डॉ. नीलम गोर्हे, उपसभापती, विधान परिषद

कोल्हापूर – कोल्हापूर येथील पत्रकारांचा घरकुल आणि निवृत्तीवेतनाचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांनी दिली. त्या मराठी पत्रकारदिनानिमित्त ‘कोल्हापूर प्रेस क्लब’मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्ष श्री. शीतल धनवडे प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, सुखदेव गिरी, समीर मुजावर, दिलीप भिसे, मालोजी केरकर, जितेंद्र शिंदे यांसह अन्य उपस्थित होते. या वेळी कोल्हापूर शहरातील ‘जायंट्स ग्रुप’च्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.