२०२८ पर्यंत काम पूर्ण होणार

मुंबई – शहरातील मलजल वाहिन्यांतील सांडपाणी समुद्रात जाऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने ७ एस्.टी.पी. अर्थात् सांडपाणी प्रक्रिया केंद्र स्थापन केली असून ही सर्व केंद्रे टप्प्याटप्प्याने वर्ष २०२६ ते २०२८ या काळात पूर्णपणे कार्यन्वित होतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे. मुंबईतील विविध प्रदूषणावर चर्चा करतांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एम्.पी.सी.बी.) या संदर्भातील तपशीलवार माहिती मागितल्यानंतर पालिकेने त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले.
१. सध्या वरळी, वांद्रे, मालाड, घाटकोपर, धारावी, भांडुप, वर्सोवा अशा ७ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे कार्यरत आहेत. जानेवारी २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
२. प्रतिदिन २४६४ दशलक्ष लिटर पाण्यावर तृतीय स्तरावरील प्रक्रिया करून ५० टक्के म्हणजे १२३२ दशलक्ष लिटर पाणी वापरण्यायोग्य करण्याची पालिकेची योजना आहे.
३. मुंबईची पाण्याची प्रतिदिनची आवश्यकता ४५०० दशलक्ष लिटर असून उपलब्ध पाणीपुरवठा हा ३८३० दशलक्ष लिटर आहे. त्यामुळे अंदाजे ६७० दशलक्ष लिटर पाण्याची तूट आहे. भविष्यात ही तूट आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुसर्या बाजूला शहरात पुरवठा केल्या जाणार्या पाण्यापैकी २४६४ दशलक्ष लिटर म्हणजे ८०-९० टक्के भाग सांडपाण्याच्या रूपाने समुद्रात सोडला जातो. हे वाया जाणारे पाणी वाचवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.