सातारा, १० जानेवारी (वार्ता.) – सातारा महानगरपालिका होण्याविषयी काही निकष आहेत. सध्या नगरपालिकेची सीमावाढ झालेली आहे. आता पुढील निवडणुकीच्या दृष्टीने जनगणना होणे आवश्यक आहे. तशी जनगणना झाली, तर विकासाला गती येऊ शकते. सातारा शहरात पुढील काळातही बसगाड्या धावतील. यादृष्टीने पावले उचलली जाणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले, ‘‘विरोधक टीका करत असले, तरी त्यांनी स्वतःचे अपयश स्वीकारायला हवे. महायुती सरकारच्या योजनांवर आणि इ.व्ही.एम्. यंत्रावर खापर फोडून उपयोगाचे नाही. मतदार राजा सुज्ञ आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळणारच आहे; मात्र कुणी अधिकार्यांनी या योजनेसाठी जाणीवपूर्वक नावे नोंदवून घेतली असतील, तर त्यांच्यावर कारवाई होईल. समृद्धी महामार्गावर खिळे टाकून गाड्या पंक्चर करण्याचा प्रकार चालू आहे. याविषयी बांधकाम विभागाला सूचना दिल्या जाणार आहेत. जे कुणी समाजकंटक हे कृत्य करत असतील त्यांच्यावर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल.’’