मी कोणताही नवीन पक्ष स्थापन करणार नाही ! – प्रशांत किशोर, निवडणूक रणनीतीकार

प्रशांत किशोर

पाटलीपुत्र (बिहार) – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले की, ते कोणताही राजकीय पक्ष काढणार नाही; मात्र भविष्यात एखादा पक्ष स्थापन केलाच, तर तो सर्वांचा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ‘मी येत्या ३-४ मासांत राज्यातील १८ सहस्र लोकांशी संवाद साधून त्यांचे विचार जाणून घेणार आहे. जर ते माझ्या विचारांशी सहमत असतील, तर त्यांना समवेत घेईन’, असेही त्यांनी सांगितले.

प्रशांत किशोर म्हणाले की,

१. बिहारमधील लोकांशी संवाद साधण्यासाठी २ ऑक्टोबरपासून मी पश्‍चिम चंपारणपासून ३ सहस्र किलोमीटरची पदयात्रा करणार आहे. लोकांना ‘जन स्वराज संकल्पने’शी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी बिहारला आश्‍वासन देतो की, माझ्याकडे जे काही आहे, ते मी बिहारच्या भल्यासाठी समर्पित करणार आहे.

२. बिहारमधील लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या ३० वर्षांच्या राजवटीतही बिहार हे देशातील सर्वांत मागासलेले आणि गरीब राज्य राहिले आहे. विकासाच्या अनेक मापदंडांमध्ये बिहार अजूनही देशातील सर्वांत खालच्या क्रमांकावर आहे. बिहारला आगामी काळात आघाडीच्या राज्यांच्या सूचीमध्ये यायचे असेल, तर त्यासाठी नवा विचार आणि नव्या प्रयत्नांची आवश्यकता आहे.