कोरोनाला बळी पडलेल्यांची संख्या फुगवून सांगणे अयोग्य ! – केंद्र सरकार

आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने केलेला दावा निराधार !

नवी देहली – तीन मे या दिवशी केंद्र सरकारच्या ‘नागरी नोंदणी विभागा’चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यावर केंद्रशासनाच्या अंतर्गत येणाऱ्या नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल म्हणाले की, अहवालातून मृत्यूदर वाढण्यामागील सर्व कारणे स्पष्ट असून विविध तर्क लावून आणि सांख्यिकी प्रणालींचा उपयोग करून भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे बळी पडलेल्यांची संख्या फुगवून सांगणे, हे पूर्णपणे अयोग्य आहे.

पॉल यांनी स्पष्ट केले की, वर्ष २०२० मध्ये मृत्यू नोंदणीचा दर वाढण्यामागे केवळ कोरोना महामारीच कारणीभूत नव्हती. कोरोनामुळे लोक ‘प्रचंड’ प्रमाणात बळी गेले, असे काही वृत्तसंस्थांकडून प्रसृत केले जात आहे. हे अयोग्य असून ते थांबले पाहिजे, असेही पॉल म्हणाले.

यासंदर्भात उदाहरण देतांना ते म्हणाले की, ‘लॅन्सेट’ नावाच्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकाने दावा केला आहे की, वर्ष २०२० आणि २०२१ या २ वर्षांत भारतात जेवढे लोक कोरोनाला बळी पडल्याचा आकडा आहे, त्यापेक्षा ८ पटींनी अधिक लोकांचा जीव गेला असेल. भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या ४ लाख ८९ सहस्र नोंदी असून ‘लॅन्सेट’ने मात्र हा आकडा ४० लाख ७ सहस्र असल्याचे सांगत जगातील सर्व देशांत हा सर्वाधिक असल्याचे सांगितले आहे.

पॉल पुढे म्हणाले की, वर्ष २०१९ मध्ये एकूण ७६ लाख ४० सहस्र लोक मृत्यूमुखी पडले, तर वर्ष २०२० मध्ये हा आकडा ८१ लाख २० सहस्र होता. ही वाढ ६.२ टक्क्यांची असून यामागे कोरोना हेच कारण नसून एकूणच लोकसंख्यावाढ, मालमत्ता अन् अन्य कारणांसाठी मृत्यूची नोंदणी केली जाणे, अशी विविध कारणे आहेत. भारतामध्ये करण्यात आलेल्या मृत्यूंच्या नोंदी या जिल्हास्तरावर अत्यंत दक्षतेने केल्या जातात. हा सामाजिक धोरणाचा पाया आहे.

संपादकीय भूमिका

कोरोनाच्या नावाखाली भारताला अपकीर्त करणाऱ्या नियतकालिकांवर सरकारने कारवाई करणे आवश्यक आहे ! यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !