वैशाख शुक्ल तृतीया (३.५.२०२२) या दिवशी सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांचा ९० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या मुली आणि सून यांनी वर्णन केलेला त्यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे. ४ मे या दिवशी पू, खेरआजी ‘संत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना झालेले लाभ’ हा भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया. (भाग ४)
या लेखाचा मागील वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/576608.html
१४. पू. आजींच्या स्थूल देहात झालेले पालट
अ. पू आजींच्या त्वचेची चकाकी वाढली आहे.
आ. त्यांची त्वचा मऊ आणि मुलायम झाली आहे.
इ. त्यांचा तोंडवळा गुलाबी दिसतो.
ई. त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूचे काही केस काळे झाले आहेत.
१५. पू. आजींमुळे वास्तू आणि परिसर यांमध्ये जाणवलेले पालट
१५ अ. पू. आजींच्या अस्तित्वामुळे घराच्या पायरीजवळ औदुंबराची रोपे आली आहेत.
१५ आ. अंगणातील प्राजक्ताचे झाड नेहमीच बहरलेले असते आणि अंगणात प्राजक्ताच्या फुलांचा सडाच पडलेला असतो.
१५ इ. विहिरीचे पाणी खारट न होणे : प्रतिवर्षी मार्च मासात पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे पाणी खारट होते आणि जून मासात ते गोड होते; पण या वर्षी मार्च मास संपत आला, तरी विहिरीचे पाणी खारट झाले नाही.
१५ ई. पू. आजींकडे पशू-पक्षी आकर्षित होणे : प्रतिदिन आमच्या दारात बऱ्याच चिमण्या येतात, तसेच भारद्वाज पक्षीही बऱ्याचदा दिसतो. परिसरात कोकिळेचे गायनही चालू असते. शुभ घटना घडायची असेल, तेव्हा गरुड पक्ष्याचे ओरडणे ऐकू येते. आमच्या दारात प्रतिदिन एक गाय येते. तिला दिलेला घास खाऊन ती जाते. पू. आजी गायीशी बोलतात. आता पू. आजी रुग्णाईत असल्याने अंथरुणावर खिळून आहेत, तरीही गाय आणि पक्षी त्या त्या वेळेत येतात. ते फार आनंदी दिसतात.
१५ उ. पू. आजींजवळ श्रीकृष्णाचे चित्र आहे. ते आता बोलके झाले आहे.
१५ ऊ. त्या जेथे पूजा करायच्या, तेथे ‘ॐ’ उमटला होता.
‘प.पू. गुरुमाऊलीने पू. आजींना संत घडवून आम्हाला अमूल्य अशी भेट दिली’, याबद्दल प.पू. गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कोटी कृतज्ञता !’
– सौ. माधुरी प्रकाश दीक्षित, सातारा (मोठी मुलगी, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि सौ. मीनल मिलिंद खेर सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), रत्नागिरी (२३.३.२०२२)
१६. सध्या पू. आजी रुग्णाईत असतांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे
१६ अ. ‘वर्ष २०२० पासून पू. खेरआजी रुणाईत असल्याने अंथरुणाला खिळून आहेत; परंतु त्याविषयी त्यांचे काही गाऱ्हाणे नसते. त्या नेहमी आनंदी असतात.
१६ आ. रुग्णाईत असतांनाही साधकांसाठी नामजप करण्याची सिद्धता असणे : एकदा साधकांनी त्यांना विचारले, ‘‘पू. आजी, काही साधकांना आध्यात्मिक त्रास होत आहे. त्यांच्यासाठी नामजप कराल का ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘या देहाचा उपयोग साधनेसाठीच होऊ दे.’’
१६ इ. दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमितपणे वाचन करणे आणि साधकांची प्रगती झाल्याचे कळल्यावर त्यांचे कौतुक करणे : पू. आजी जेवण झाल्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनच्या ग्रंथाची १ – २ पाने नियमितपणे वाचतात. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून कोणा साधकाची आध्यात्मिक प्रगती झाल्याचे कळल्यास पू. आजी आवर्जून त्याविषयी आमच्याशी चर्चा करतात. त्या आम्हाला लगेचच प्रगती झालेल्या साधकाला भ्रमणभाष करायला सांगतात आणि त्याचे कौतुक करतात.’
– सौ. मीनल मिलिंद खेर (२३.३.२०२२)
१६ ई. ‘मी पू. आजींकडे सेवेच्या निमित्ताने जाते. तेव्हा मला त्यांचा सहवास मिळतो. त्यांच्या तोंडवळ्यावर पुष्कळ तेज जाणवते.
१६ उ. बोलतांना त्या काही गमती-जमती सांगतात. तेव्हा त्यांचा बालकभाव जाणवतो.’ – सौ. रोहिणी रमेश ताम्हनकर (धाकटी मुलगी, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), रत्नागिरी
१७. पू. आजी रुग्णाईत असतांना वैद्य मंदार भिडे यांनी त्यांच्यावर केलेले उपचार !
१७ अ. प्रतिदिन बस्ती देणे : ‘वर्ष २०२० मध्ये पू. आजी रुग्णाईत असतांना वैद्य मंदार भिडे मला म्हणाले, ‘‘त्यांना बस्ती द्या.’’ ती सूर्याेदय आणि सूर्यास्त यांच्या आधी द्यायची असते. प्रत्येकी १ भांडे दूध आणि १ भांडे पाणी एकत्र करून त्यात १ इंच गूळवेलीचा तुकडा, १ इंच जेष्ठमधाचा तुकडा आणि१ इंच हळदीचा तुकडा, हे सर्व ठेचून घालायचे आणि ते उकळून त्याचा एक भांडे काढा करायचा. त्या काढ्यात १ चमचा साजूक तूप घालून त्याने बस्ती द्यायची. त्यामुळे आतडी मऊ रहातात. त्याप्रमाणे पू. आजींना प्रतिदिन बस्ती चालू आहे.
१७ आ. मल-मूत्रविसर्जन होत असल्याची जाणीव होण्यासाठी केलेला उपचार : पू. आजींना मल-मूत्रविसर्जन झाल्याचे समजत नसे. वैद्य मंदार भिडे यांनी मला सांगितले, ‘‘त्यांच्या नाभीत तूप सोडा. पहाटे ४ वाजता तेथे तूप मुरवा, म्हणजे सकाळी ७ वाजेपर्यंत त्यांना शौचाला होईल.’’ मी त्याप्रमाणे करण्यास प्रारंभ केला. ४ – ५ दिवसांनी त्यांना लघवी लागल्याची जाणीव होऊ लागली.
१७ इ. अंगातील उष्णता न्यून करण्यासाठी केलेले उपचार : पू. आजींचे डोके एवढे गरम असायचे की, त्यांच्या डोक्याला तेल लावल्यावर ते लगेच जिरायचे. त्यांच्या पायांना तेल लावून घासल्यावर पायांतून उष्णता बाहेर पडतांना जाणवायची. मग ‘त्यांना दुधात तूप घालून कोहळ्याचा रस देणे, भातावरील पातळ पेजेत मीठ आणि तूप घालून देणे’, असे उपचार केले. हळूहळू हे त्रासही न्यून झाले.
१८. पू. आजींवर होत असलेली वाईट शक्तींची आक्रमणे
१८ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’ची छपाई पुन्हा चालू होण्यासाठी प्रार्थना केल्यावर डोळ्यांनी दिसणे बंद होणे आणि डोळ्यांवरील वाईट शक्तीचे आवरण काढून आध्यात्मिक उपाय केल्यावर दिसू लागणे : वर्ष २०२० मध्ये कोरोनामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीच्या अंकाची छपाई बंद झाली होती. ती पुन्हा चालू होण्यासाठीपू. आजी नामजप आणि प्रार्थना करत होत्या. एक दिवस सकाळी श्री. मिलिंद खेर (पू. आजींचा मुलगा) पू. आजींच्या समोर बसले, तरी पू. आजींना ते दिसेनात; म्हणून त्यांना नेत्ररोग तज्ञांना दाखवले. त्यांचा चष्मा पालटला, तरी त्यांना दिसेना. तेव्हा ‘पू. आजींवर वाईट शक्तींचे आक्रमण झाले असणार’, असे माझ्या लक्षात आले. नंतर त्यांच्या डोळ्यांवरील आवरण काढून अत्तर आणि कापूर यांचे उपाय करणे वाढवले. त्यानंतर हळूहळू पू. आजींना दिसायला लागले.
१८ आ. सर्व अंग थंड पडणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने हळूहळू बरे वाटणे : २ वर्षांपूर्वी पू. आजी रुग्णाईत झाल्या होत्या. तेव्हा एकदा त्यांचे संपूर्ण अंग थंड पडले होते; म्हणून मी त्यांच्या पायांना आणि डोक्याला अमृतांजन लावले, तरीही त्यांची काही हालचाल होत नव्हती; म्हणून मी वैद्य मंदार भिडे यांना बोलावले. त्यांनी पू. आजींना तपासून सांगितले, ‘‘यांना काही शारिरीक त्रास नाही. तुम्ही सद्गुरु राजेंद्रदादा (सद्गुरु राजेंद्र शिंदे) यांना उपाय विचारा.’’ सद्गुरु राजेंद्रदादा आम्हाला म्हणाले, ‘‘मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारून नामजप सांगतो.’’ थोड्या वेळाने मला सद्गुरु राजेंद्रदादांचा भ्रमणभाष आला. ते आम्हाला म्हणाले, ‘‘पू. आजींवर पुष्कळ त्रासदायक शक्तीचे आवरण आले होते. ते मी काढले आहे. आता बरे वाटेल.’’ त्यांनी पू. आजींसाठी सांगितलेला नामजप आम्ही केला. नंतर सौ. मंजिरीताईने (सौ. मंजिरी विनायक आगवेकर (पू. आजींची नात (मोठ्या मुलीची मुलगी), आध्यत्मिक पातळी ६३ टक्के) यांनी)) १ घंटा नामजप केला. आम्ही सर्व जण नामजप करत होतो. त्यानंतर हळूहळू पू. आजींना बरे वाटायला लागले. नंतर पू. आजींनीही नामजप केला. (क्रमशः)
– सौ. मीनल मिलिंद खेर, रत्नागिरी (२३.३.२०२२)
|