काल वैशाख शुक्ल तृतीया (३.५.२०२२) या दिवशी सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेर यांचा ९० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांची मुलगी आणि सून यांनी वर्णन केलेला त्यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे. ३ मे या दिवशी पू. खेर आजी यांची गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज पुढील भाग पाहूया. (भाग ३)
या लेखाचा मागील वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/576263.html
११. ‘पू. आजींची आध्यात्मिक पातळी ६० टक्के होण्यापासून त्यांचे संतपद घोषित होणे’, या कालावधीत त्यांच्यामध्ये झालेला पालट
११ अ. राग न्यून होणे : ‘पू. खेरआजींचा मुलगा श्री. मिलिंद खेर आणि नातू श्री. अनिकेत खेर यांच्याविषयी कुणी काही बोलले, तर पू. आजींना राग यायचा; पण तो व्यक्त होत नसे. ‘या स्वभावदोषामुळे साधनेत स्वतःची हानी होत आहे’, हे पू. आजींच्या लक्षात आले आणि त्यावर त्यांनी मात केली. त्यानंतर ‘आता पू. आजींना राग येत नाही’, असे कुटुंबियांच्या लक्षात आले आहे.
१२. डोळ्याच्या शस्त्रकर्माच्या वेळी आणि शस्त्रकर्मानंतर पू. आजींमधील देव अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव अनुभवायला मिळणे
१२ अ. पू. आजींचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असल्याने शस्त्रकर्माच्या वेळी त्यांच्या तोंडवळ्यावर कोणताही त्रास किंवा काळजी न दिसणे : वर्ष २०१५ मध्ये पू. आजींच्या डोळ्यातील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म करण्याचे ठरले. पू. आजींना शस्त्रकर्म करायला नेले. तेव्हा त्यांचा रक्तदाब सामान्य (Normal) होता. पू. आजींचा गुरुदेवांप्रती भाव असल्याने त्यांच्या तोंडवळ्यावर कोणताही त्रास किंवा काळजी दिसत नव्हती. त्या सारख्या म्हणत होत्या, ‘‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले), तुम्ही माझ्या समवेत आहात. मग मला कसली काळजी ?’’
१२ आ. शस्त्रकर्मानंतर पू. आजींची सेवा करतांना ‘देवाप्रती भाव कसा असायला हवा ?’, हे शिकायला मिळणे : शस्त्रकर्मानंतर घरी आल्यावर पू. आजींची सेवा करत असतांना त्या मला एकेक सूत्र सांगायच्या. ते माझ्या हृदयावर कोरून राहिले आहे. पू. आजी म्हणजे देवाचेच मूर्तीमंत रूप आहेत. या स्थितीतही ‘त्यांचे बोलणे, चालणे, वेळेचे पालन करणे’ आणि ‘देवाप्रती भाव कसा ठेवावा ? देवाचा एकेक गुण कसा आत्मसात करायचा ?’, अशा अनेक गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. त्या जेवायला बसल्यावर देवाला प्रार्थना करायच्या. तेव्हा ‘प्रत्यक्ष भगवंतच समोर आहे आणि त्या त्यालाच प्रार्थना करत आहेत’, असे आम्हाला वाटायचे. संध्याकाळी आमच्या घरातील देव्हाऱ्यावर सूर्यकिरण पडतात. ते पाहून त्यांना पुष्कळ आनंद व्हायचा.
१३. पू. आजी संत झाल्यामुळे कुटुंबियांना होत असलेले लाभ
अ. ‘पू. आजींमुळे घराची वास्तू आणि घरातील व्यक्ती यांना चैतन्य मिळत आहे’, असे जाणवते.
आ. त्यांची सेवा करतांना आम्हाला पुष्कळ आनंद मिळतो.
इ. खेर कुटुंबाला तीव्र आध्यात्मिक त्रास आहेत; पण गुरुदेवांच्या कृपेमुळेच पू. आजींच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रसंगातून तरून जात असून त्यासाठी गुरुदेवच आम्हाला शक्ती देत आहेत. त्यामुळे कुटुंबियांचे प्रारब्ध भोगणे सुकर होत आहे.
ई. पू. आजींमुळे आम्हा कुटुंबियांची व्यष्टी आणि समष्टी साधना होत आहे. पू. आजींमुळे त्यांची सर्व मुले आणि नातवंडे, असा सर्व परिवार साधनेत आहे. त्यामुळे साधक, आमचे शेजारी आणि समोरच्या वसाहतीतील लोक, या सर्वांनाच पू. आजींचे कौतुक वाटते.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. आजींच्या माध्यमातून आम्हाला संतांचा सहवास आणि चैतन्याचा स्रोत दिला’, याबद्दल आम्हाला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटते. (क्रमशः)
– सौ. माधुरी प्रकाश दीक्षित, सातारा (मोठी मुलगी, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि सौ. मीनल मिलिंद खेर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), रत्नागिरी (२३.३.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |