(म्हणे) ‘बळजोरीने भोंगे काढल्यास आम्ही मशिदींना संरक्षण देऊ !’ – रामदास आठवले

मुंबई – मुसलमान समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. मशिदींवरील भोंगे बळजोरीने काढले जात असतील, तर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मशिदींना संरक्षण देतील, अशी भोंग्यांविषयीची भूमिका भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

रामदास आठवले म्हणाले, ‘‘मशिदींपुढे हनुमान चालिसा लावत असाल, तर त्याला आमचा विरोध नाही. आम्ही मशिदींवरील भोंगे काढण्याच्या मनसेच्या भूमिकेच्या विरोधात आहोत. बळजोरीने ध्वनीवर्धक काढता कामा नये. आवाज न्यून करण्याविषयी सूचना देऊ शकतो. भाजपने समर्थन दिले असले, तरी माझ्या पक्षाचे मनसेला समर्थन नाही. हा विषय धार्मिक आहे. मशिदीवरचे भोंगे काढण्याविषयी आतापर्यंत कुठल्याही तक्रारी आलेल्या नाहीत.

(याविषयी आलेल्या अनेक तक्रारींवरूनच न्यायालयात खटले चालले आहेत, याची माहिती रामदास आठवले यांनी घ्यावी ! – संपादक) आधीपासून चालू असलेले भोंगे कशाला काढायचे ? ते (मुसलमान) आपल्या सणांना तक्रार करत नाहीत. हिंदु-मुसलमान यांच्यात वाद होता कामा नये.’’ (न्यायालयाच्या आदेशानुसार हिंदु त्यांच्या सणांना ध्वनीवर्धकांच्या आवाजाच्या मर्यादा पाळतात, मग धर्मांधांना त्याचे पालन करण्यात काय अडचण आहे ? वाद हिंदूंमुळे नव्हे, तर न्यायालयाचा आदेश डावलणार्‍यांमुळे निर्माण झाला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. असे असतांना  लोकप्रतिनिधींकडून मशिदींना संरक्षण देणे, हा न्यायालयाचा अवमानच नव्हे का ? लोकप्रतिनिधीच जर न्यायालयाचा आदेश जुमानत नसतील, तर अशांवर कारवाईची मागणी झाल्यास आश्‍चर्य ते काय ?