स्त्रियांच्या आरोग्याविषयी समस्या आणि त्यांवरील उपाय !

१. अनेक तपासण्या करण्यापेक्षा आधुनिक वैद्यांच्या सल्ल्याने आवश्यक तेवढ्याच तपासण्या कराव्यात !

अलीकडे स्वतःच्या वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालांचा असा गठ्ठा घेऊन अनेक रुग्ण येत असतात. आवश्यकता नसलेल्या अनेक तपासण्या करायच्या, नंतर त्याच्या निर्णयाविषयी ‘गूगल’वर माहिती शोधायची आणि मग भयंकर गोष्टी वाचल्या की, पुष्कळ ताण घेऊन आधुनिक वैद्यांकडे धाव घ्यायची, असे स्वरूप सध्या सगळीकडे झाले आहे. त्यामुळे आधी आधुनिक वैद्यांकडे जाऊन कोणत्या तपासण्यांची आवश्यकता आहे, हे विचारून घेणे सर्वांत चांगले आहे.

२. पाळीच्या संदर्भातील समस्यांसाठी स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक !

वयाप्रमाणे स्त्रियांना कोणत्या वयात कोणत्या तपासण्यांची आवश्यकता असते, ते पाहूया. मुलींची पाळी चालू झाली की, ती प्रारंभी अनियमित असते. प्रारंभी पाळी उशिरा येत असेल आणि रक्तस्राव अल्प असेल, तर काळजी करण्यासारखे काही नाही; मात्र पाळी २१ दिवसांच्या आत येत असेल, रक्तस्राव ७ दिवसांहून अधिक होत असेल आणि रक्ताच्या गाठी पडत असतील, तर अशा मुलींना स्त्रीरोगतज्ञाकडे नेणे आवश्यक आहे. या मुलींच्या हिमोग्लोबिन, थायरॉईड, इतर काही हॉर्मोन्स (संप्रेरक), रक्त गोठण्याची प्रक्रिया आदींच्या तपासणीच्या चाचण्या आणि सोनोग्राफी करणे आवश्यक असते.

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

३. लग्न ठरवतांना वर आणि वधू या दोघांच्याही ‘एच्आयव्ही’ आणि ‘एच्बीएस्एजी’ तपासण्या करून भविष्यातील संकट टाळावे !

लग्न ठरवतांना वर आणि वधू या दोघांच्याही ‘एच्.आय.व्ही.’ आणि ‘एच्.बी.एस्.ए.जी.’ म्हणजेच एड्स आणि ‘हिपॅटायटीस बी’ (यकृताविषयीचा आजार) या तपासण्या होणे अत्यावश्यक आहे. हे दोन्हीही आजार एका जोडीदाराकडून दुसर्‍याला होऊ शकतात आणि ते असाध्य आजार आहेत. आपल्या समाजात लग्न ठरवतांना केवळ रक्तगट बघितला जातो. खरे तर त्याची काहीच आवश्यकता नसते. वर आणि वधू यांचा एकच रक्तगट असल्याने काहीही फरक पडत नाही. तसेच मुलीचा रक्तगट ‘निगेटिव्ह’ आणि मुलाचा ‘पॉझिटिव्ह’ असेल, तर पहिल्या बाळंतपणात काही इंजेक्शने द्यावी लागतात. त्यामुळे लग्न जुळवतांना रक्तगट ही अडचण ठरू शकत नाही.

४. दांपत्य म्हणून जीवन जगत असतांना घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या चाचण्या

मूल होऊ देण्याचा निर्णय घेतल्यावर दांपत्याने एकदा स्त्रीरोगतज्ञांना भेटणे आवश्यक आहे. महिलांनी हिमोग्लोबिन, थायरॉईड आणि रक्तातील साखर या चाचण्या दिवस रहाण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. थायरॉईड हार्मोनची पातळी योग्य नसेल, तर दिवस न रहाणे, राहिल्यास गर्भपात होणे, गर्भारपणात गुंतागुंत होणे, अशा समस्या येऊ शकतात. स्त्रीचे वजन पुष्कळ अधिक असेल, तर दिवस रहाण्यापूर्वी ते न्यून करणे, हे तिच्या आणि बाळाच्या भविष्यातील प्रकृतीसाठी पुष्कळ महत्त्वाचे ठरते. दिवस रहात असतांना जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे बाळामध्ये व्यंग येऊ नये; म्हणून ‘फॉलिक ॲसिड’ आणि ‘जीवनसत्त्व बी १२’ या गोळ्या चालू कराव्यात.

स्त्रीचे लैंगिक जीवन चालू झाल्यावर गर्भाशयाच्या मुखाची तपासणी खरे तर प्रतिवर्षी व्हायला हवी. ‘ह्युमन पपिलोमा व्हायरस’ (एच्.पी.व्ही.) या विषाणूच्या संसर्गामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो. या आजाराचे प्रमाण आपल्या देशात सर्वाधिक आहे. आपल्याला या संसर्गाचे आणि कर्करोगाचे निदान पुष्कळ आधी करणे शक्य आहे. त्यामुळे स्त्रीचा प्राण वाचू शकतो. ‘एल्.बी.सी. अँड एच्.पी.व्ही. (लिक्विड बेस्ड किटोलॉजी + एच्.पी.व्ही. एन्.ए. पी.सी.आर्.)’ ही चाचणी प्रति ५ वर्षांनी केली, तर हा धोका स्त्रिया आयुष्यभर टाळू शकतात. यासाठी केवळ स्त्रियांनी जागरूकता दाखवण्याची आवश्यकता आहे.

५. कर्करोग होऊ नये यासाठी स्त्रियांनी नियमितपणे तपासणी करणे आवश्यक !

आता वयात आलेल्या मुलींना ‘एच्.पी.व्ही.’ची लस दिली जाते, जी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून त्यांचे रक्षण करू शकते. सर्व मुलींना ही लस देणे योग्य आहे; पण दुर्दैवाने ही लस पुष्कळ महागडी आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरीब मुलींना ती देणे शक्य होत नसल्यामुळे गरीब महिलांमध्ये हा कर्करोग अधिक प्रमाणात आढळून येतो. मुलींनी लस घेतली असली, तरी त्यांनी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. एकदा लैंगिक संबंध चालू झाल्यानंतर लस घेण्याचा लाभ त्यामानाने अल्प आहे. त्यामुळे नियमित तपासणीला पर्याय नाही.

स्त्रीच्या ४५ वयानंतर एक ‘मॅमोग्राफी’ (स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठीची एक्स-रे चाचणी) करून घेण्याचा सल्ला दिला जातो. सध्या स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण भारतीय स्त्रियांमध्ये वाढतांना दिसत आहे. ज्या स्त्रियांच्या जवळच्या नात्यात (बहीण, आई, मावशी, मावस बहीण यांना) स्तनाचा कर्करोग असेल, त्यांनी मॅमोग्राफीला आधी प्रारंभ करावा. जवळच्या नात्यातील महिलेला ज्या वयात कर्करोगाचा प्रारंभ झाला असेल, त्याच्या ५ वर्षे आधीपासूनच तपासण्या नियमित कराव्यात. काही प्रकारचे स्तनाचे कर्करोग अनुवंशिक असतील, तर तो धोका रक्ताच्या तपासण्या करून आधीच ओळखता येऊ शकतो. यासाठी ‘बी.आर्.सी.ए.-१’ आणि ‘बी.आर्.सी.ए.-२’ या चाचण्या तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे करता येतात.

मुलगी वयात आल्यापासून आयुष्यभर प्रत्येक मासातून एकदा तिने नियमित स्वतःची स्वतः स्तनाची तपासणी करणे अनिवार्य आहे. ही तपासणी कोणताही खर्च न करता होते आणि अतिशय उपयोगी आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये स्तनातील गाठ स्त्रीला या तपासणीत लगेच जाणवू शकते.

६. अनियमित पाळी आणि अतीरक्तस्त्राव होणार्‍या स्त्रियांनी करावयाची तपासणी

आपल्या समाजात स्त्रिया पाळीचे त्रास वर्षानुवर्षे अंगावर काढतात. अनियमित पाळी, अतीरक्तस्त्राव असे त्रास असलेल्या स्त्रियांनी वेळेवर स्त्रीरोगतज्ञांना दाखवून घेणे आवश्यक आहे. या महिलांनी सोनोग्राफी आणि हिमोग्लोबिन, थायरॉईड, प्रोलॅक्शन यांसारख्या तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. अशा वेळी काही कारण नसतांना लिव्हर (यकृत), किडनी आणि इलेक्ट्रोलिटेस आदींच्या चाचण्या आवश्यक नाहीत.

७. योनीमार्गाचे आणि लघवीचे संसर्ग टाळण्यासाठी रक्तातील साखरेची तपासणी करणे आवश्यक !

सतत होणारे योनीमार्गाचे आणि लघवीचे संसर्ग ही एक नेहमी आढळणारी अन् स्त्रियांना त्रस्त करून सोडणारी समस्या आहे. हे संसर्ग वारंवार होऊ लागले, तर रक्तातील साखर तपासणे अत्यावश्यक आहे. केवळ ‘रॅण्डम बी.एस्.एल्.’ (कोणत्याही वेळेस केलेली साखरेची तपासणी) करणे पुरेसे नाही. तुमच्या रक्तातील गेल्या ३ मासांतील साखरेचे प्रमाण सांगणारी ‘एच्.बी.ए.-१ सी’ ही तपासणी खर्‍या परिस्थितीची कल्पना देते. प्रत्येक मधुमेही रुग्णाने ही तपासणी प्रति ३ मासांनी केली, तरच मधुमेह नियंत्रणात राहू शकतो.

अलीकडे अगदी वयाच्या ३० व्या वर्षापासूनच आम्ही मधुमेहाचे रुग्ण सर्रास बघत आहोत. लक्षणे दिसत असतानांही रुग्ण या तपासण्या करून घेण्यास पुष्कळ टाळाटाळ करतात. मधुमेह आहे, हे स्वीकारायलाच इतका वेळ जातो की, तो नियंत्रणात आणणे पुष्कळ वेळा अवघड होते. मधुमेह नियंत्रणात आल्याखेरीज योनीमार्गाचे आणि लघवीचे संसर्ग कितीही औषधे दिली, तरी बरे होत नाहीत, हे वैद्यकीय सत्य आहे. मधुमेही रुग्णांचे डोळे आणि किडनी यांच्या तपासण्याही आधुनिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार वेळेवर करून घेतल्या पाहिजेत.

८. महिलांनी प्रतिवर्षी एकदा स्त्री रोगतज्ञांकडून तपासणी आणि पोटाची सोनोग्राफी करणे अत्यावश्यक

एक अतीमहत्त्वाचे सूत्र, म्हणजे पाळी थांबल्यावरही महिलांनी प्रतिवर्षी स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी आणि पोटाची सोनोग्राफी करणे अत्यावश्यक आहे. सोनोग्राफीविना गर्भाशय आणि अंडाशयाचे (‘ओवरी’चे) आजार, ट्यूमर यांचे निदान होऊ शकत नाही, तसेच वेळेवर निदान झाल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात. ‘मोनोपॉज’नंतर नियमित तपासण्या करून घेणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे; कारण बर्‍याच आजारांचा प्रारंभ वयाच्या ४५ वर्षांनंतर होऊ शकतो. साधारण चाळीशी नंतर प्रतिवर्षी थायरॉईड आणि साखर यांच्या तपासण्या करणे योग्य आहे, तसेच ईसीजी (हृदय स्पंदन आलेख) काढून त्याची छायांकित प्रत (झेरॉक्स) स्वतःजवळ ठेवणे आवश्यक आहे. पुढे कधीही छातीत दुखण्याचा त्रास झाला, तर ‘ईसीजी’मध्ये झालेले पालट आधीचे होते कि आता झाले आहेत ? हे वेळेत लक्षात आले, तसे उपचार करणे आधुनिक वैद्यांना सोपे जाते. ज्यांच्या कुटुंबात ‘कोलेस्टेरॉल’ अधिक असण्याची अनुवंशिकता आहे, त्यांनी वर्षातून एकदा ‘लिपिडप्रोफाईल’ ही तपासणी करावी. यासह मधून मधून रक्तदाब तपासणे सयुक्तिक आहे.

लोकहो स्वतःच्या मनाने भारंभार तपासण्या करूनही तुमच्या आजाराच्या दृष्टीने एखादी महत्त्वाची तपासणी राहून जाऊ शकते. अहवालांची थप्पी काढून घेतली, म्हणजे आपल्या आरोग्याविषयीचे आपले दायित्व संपले, असे होत नाही. त्यापेक्षा वैद्यकीय सल्ल्याने आवश्यकता असतील तितक्याच तपासण्या करणे तुमच्या हिताचे आहे.

– डॉ. शिल्पा चिटणीस जोशी, स्त्रीरोग अणि वंध्यत्व तज्ञ, कोथरूड, पुणे.