सौ. सुनंदा नंदकुमार जाधव यांना प.पू. भक्तराज महाराज आणि शिष्य डॉ. आठवले यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील साधिका सौ. सुनंदा नंदकुमार जाधव (सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांची पत्नी) यांचा वैशाख शुक्ल द्वितीया या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या साधनाप्रवासातील काही अनुभूती येथे देत आहोत.

सौै. सुनंदा जाधव

सौै. सुनंदा जाधव यांना सनातन परिवाराच्या वतीने ६१ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

१. साधनेत येण्यापूर्वीच कुलदेवता श्रीनाथ महाराज यांच्या कृपेने प.पू. भक्तराज महाराज यांनी केलेले साहाय्य !

१ अ. लग्नापूर्वी एकाने ५ वेळा कुलदेवतेचे दर्शन घेण्यास सांगणे : ‘माझ्या लग्नापूर्वी एकाने मला कुलदेवतेला (श्रीनाथमचकोबा महाराज, वीर, पुरंदर, पुणे) ५ वेळा जाऊन येण्यास सांगितले होते. त्यानुसार मी कुलदेवतेला जात होते. वर्ष १९७९ मधील आषाढ मासात माझी तिसरी वारी होती. ते पावसाचे दिवस असून तो पौर्णिमेचा दिवस होता. कुलदेवाला जातांना नीरा नदीवर असलेले वीर धरण ओलांडून पुढे जावे लागत होते. मंदिरात जातांना आम्ही नीरा नदीवरील पुलावरून गेलो.

१ आ. नीरा नदीच्या पुलावर पाणी वहात असल्याने पुलावरून जाण्यास भीती वाटणे, एका आजोबांनी पूल ओलांडण्यासाठी साहाय्य करणे; पण त्यानंतर ते अकस्मात् अंतर्धान पावणे : कुलदेवतेचे दर्शन घेऊन परत येईपर्यंत धरणातील पाणी सोडल्यामुळे नीरा नदीच्या पुलावर पाणी आले होते. त्या पुलाच्या वरील बाजूला आणखी एक ‘कॅनाल’चा पूल होता. त्या पुलाच्या बाजूला एक पायवाट होती; पण त्या वाटेवरही पुष्कळ पाणी असल्यामुळे तेथून जाण्यासही आम्हाला भीती वाटत होती. ‘कसे जायचे ?’, असा विचार करत असतांनाच एक धोतर नेसलेले, सदरा घातलेले आणि हातात छत्री घेतलेले आजोबा आले. ते आम्हाला (मी, माझी वहिनी आणि भाची) म्हणाले, ‘‘मी पुढे होतो. तुम्ही माझ्या या छत्रीला धरून या.’’ आम्ही त्यांच्या छत्रीला धरून त्यांच्या मागे निघालो. त्यांनी आम्हाला पैलतिरी सोडले. त्यानंतर ते परत जायला निघाले. आम्ही ४ – ५ पावले पुढे गेल्यावर सहज मागे वळून पाहिले, तर तिथे कुणीच नव्हते.

१ इ. वरील प्रसंगानंतर काही दिवसांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू करणे, तेव्हा आम्हाला साहाय्य करणारे आजोबा, म्हणजे ‘प.पू. भक्तराज महाराज होते’, असे लक्षात येणे : घरी गेल्यावर आम्ही वडिलांना वरील प्रसंग सांगितला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुमच्या साहाय्याला आलेले आजोबा म्हणजे आपले कुलदैवत श्रीनाथ महाराज होते.’’ पुढे आम्ही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केली. तेव्हा ‘आम्हाला साहाय्य करणारे आजोबा म्हणजे प.पू. भक्तराज महाराज होते’, असे आमच्या लक्षात आले.

२. हनुमत्कवच यज्ञानंतर होणार्‍या आरतीला परात्पर गुरु डॉ. आठवले येणे आणि त्या वेळी त्यांच्या शरिराभोवती एक वलय दिसणे

पूर्वी मी मिरज आश्रमात रहात असतांना मला सेवेतून पुष्कळ आनंद मिळायचा. त्यामुळे ‘तेथील आरतीला जावे’, असे मला कधी वाटले नाही. एकदा तिथे हनुमत्कवच यज्ञ होता. यज्ञाच्या दिवशी एका साधिकेने मला आग्रह केला; म्हणून मी आरतीला गेले. पायर्‍यांवरून ध्यानमंदिरात जातांना मला चांगले वाटत होते. आरती चालू झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टर तेथे आले आणि आरतीला उभे राहिले. तेव्हा मला त्यांच्या शरिराभोवती एक वलय दिसले.’

– सौ. सुनंदा नंदकुमार जाधव (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०२१)