रेल्वेप्रशासनाकडे हानीभरपाई देण्याची मागणी
रत्नागिरी – येथील रेल्वेस्थानकातून देहली येथे आंबे (हापूस) पाठवण्यासाठी आरक्षण करण्यात आले होते. ३ दिवस होऊनही हापूसच्या पेट्या स्थानकामध्येच पडून रहिल्याने २ लाख २४ सहस्र ४०० रुपयांची हानी झाली. पुढील १५ दिवसांत हानीभरपाई मिळावी, अन्यथा ग्राहक न्यायालयात दावा प्रविष्ट करावा लागेल, असे पत्र बागायतदार समीर दामले यांनी येथील रेल्वेस्थानक प्रमुखांना दिले आहे.
दामले यांनी यावर्षी २ वेळा काही हापूसच्या पेट्या नवी देहलीला रेल्वेमधूनच पाठवल्या होत्या. २८ एप्रिल या दिवशी ३७४ किलो हापूस रत्नागिरी ते हजरत निजामुद्दीन (नवी देहली) रेल्वेस्थानकापर्यंत (पावती क्र. ३६४५८४) पाठवण्यासाठी आरक्षण करण्यात आले होते. त्या दिवशी हजरत निजामुद्दीन गाडीत जागा नसल्याचे कारण सांगण्यात आले. २९ एप्रिल या दिवशी राजधानी एक्सप्रेसमध्येही जागा नसल्याचे कारण देण्यात आले. त्यानंतर दक्षिणेकडील रेल्वेस्थानकातून मालगाडीत मटण भरण्यात आले होते. त्यामुळे हापूस पाठवण्यासाठी गाडीत जागाच मिळाली नाही. ३० एप्रिलला दामले यांना रेल्वेच्या अधिकार्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. वाढता उष्मा आणि सलग ३ दिवस आंबे जागेवरच पडून राहिल्यामुळे ते खराब होण्याचीच शक्यता असल्याने बागायतदार दामले यांनी हानीभरपाईची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिका‘रेल्वेमधून हापूसची वाहतूक करावी’, अशी आग्रही भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी आता गप्प का ? |