पैशांचे आमीष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण
बार्शी (जिल्हा सोलापूर) – गुंतवणूकदारांना मोठ्या रकमेचे आमीष दाखवून परतावा न देता फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी विशाल अंबादास फटे याच्यासह अंबादास गणपति फटे, वैभव अंबादास फटे, राधिका विशाल फटे, अलका अंबादास फटे यांच्याविरुद्ध बार्शी शहर पोलिसांनी विशेष न्यायालयात १ सहस्र ४०० पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे.
१. या प्रकरणी दीपक बाबासाहेब अंबारे याने बार्शी शहर पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट केली होती. यात केलेल्या आरोपानुसार वर्ष २०१६ मध्ये ‘शेअर मार्केट’मध्ये पैसे गुंतवून अधिक लाभ करून देण्याच्या आमिषाने विशाल फटे याने ‘विश्लका कन्सलंटसी प्रा.लि.’, ‘अलका शेअर सर्व्हिसेस’, ‘जे.एम्. फायनान्शियल सर्व्हिसेस’ या आस्थापनांमध्ये रक्कम गुंतवली होती.
२. विशाल फटे याने ठेवीदारांना ‘ट्रेडिंग’मध्ये पैसे गुंतवून प्रतिदिन २ टक्के लाभ मिळवून देण्याचे आमीष दाखवले होते. विशाल फटे याच्यावर विश्वास ठेवून तक्रारदारासह अन्य लोकांनी एकूण ५ कोटी ६३ लाख २५ सहस्र रुपयांची गुंतवणूक केली होती; मात्र काही कालावधीनंतर पैसे परत मिळाले नसल्याने फसवणूक झाल्याने उघड झाले होते.