पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांच्या चरणी ९० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
उद्या वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजे अक्षय्य तृतीया (३.५.२०२२) या दिवशी सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेर यांचा ९० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी आणि सून यांनी वर्णन केलेला त्यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे. (भाग १)
१. जन्म आणि बालपण
पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांचा जन्म अक्षय्य तृतीया (८.५.१९३२) या दिवशी तोंडदे (जिल्हा रत्नागिरी) येथे झाला. त्यांचे माहेरचे नाव लीलावती होते. पू. आजी त्यांचे आई-वडील ((कै.) रखुमाबाई विठ्ठल फळणीकर आणि (कै.) विठ्ठल फळणीकर)), ४ भावंडे ((कै.) यशवंत विठ्ठल फळणीकर, श्री. शशिकांत विठ्ठल फळणीकर, (कै.) रेवती सरदेसाई आणि (कै.) कलावती अंबर्डेकर)); २ काका-काकू ((कै.) बळवंत सखाराम फळणीकर आणि (कै.) यशोदा फळणीकर अन् (कै.) पुरुषोत्तम सखाराम फळणीकर आणि (कै.) इंदिरा फळणीकर)) अन् त्यांची मुले, अशा मोठ्या एकत्र कुटुंबात वाढल्या.
पू. आजींच्या आई-वडिलांनी सर्वांना शिस्त लावली होती.
१ अ. पू. आजींमध्ये बालपणापासून असलेले गुण : बालपणापासूनच पू. आजींचे वागणे आणि बोलणे आदर्श होते. ‘इतरांना समजून घेणे आणि इतरांचे गुण पारखून त्यांच्याकडून कामे करवून घेणे’, हे त्यांना चांगले जमायचे. ‘दुसर्यांना नावे ठेवणे आणि दोष देणे’, असे त्यांच्याकडून कधी झाले नाही. त्या सर्वांमध्ये मिळूनमिसळून रहायच्या. त्या कुणाच्या मागे त्यांच्याविषयी बोलत नाहीत. ‘सतत दुसर्यांचा विचार करणे, परिस्थितीला नावे न ठेवता ‘त्यातून पुढे कसे जायचे ? काटकसरीने कसे वागायचे ?’, असा त्यांचा विचार असायचा.
१ आ. अध्यात्माची आवड असणे : पू. आजींच्या घरातील वातावरण आध्यात्मिक होते आणि त्यांनाही अध्यात्माची आवड होती. त्यांना ‘स्तोत्रे म्हणणे आणि देवळात जाणे’ लहानपणापासून आवडायचे.
२. शिक्षण
पू. आजींचे शिक्षण मुंबईत त्यांच्या बहिणीकडे ((कै.) रेवती सरदेसाई यांच्याकडे) झाले. त्यांचे इंग्रजी चांगले होते. त्यांचे शिक्षण जुन्या ‘मॅट्रिक’पर्यंत झाले आहे.
३. सात्त्विक राहणीमान
पू. आजींची वेशभूषा भारतीय संस्कृतीनुसार होती. त्या लहानपणी सात्त्विक झगा (‘फ्रॉक’), नंतर परकर-पोलके आणि मोठ्या झाल्यावर साडी नेसायच्या. त्यांना बाहेरील पदार्थ खाण्याची आवड नव्हती. त्या घरातील पदार्थच आवडीने खायच्या.
४. विवाह
वर्ष १९५४ मध्ये पू. आजींचा विवाह श्रीधर जगन्नाथ खेर यांच्याशी वयाच्या २२ व्या वर्षी झाला. त्यांना १ मुलगा (श्री. मिलिंद श्रीधर खेर) आणि २ मुली (सौ. माधुरी प्रकाश दीक्षित अन् सौ. रोहिणी रमेश ताम्हनकर) आहेत.
५. सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वी पू. आजींनी केलेली साधना
अ. प्रतिदिन सूर्याेदयानंतर पू. आजी सूर्यदर्शन करून त्याची मानसपूजा करत असत. त्या सूर्याला अर्घ्य देत असत आणि नियमित सूर्याचा नामजप करत असत.
आ. त्या प्रतिदिन सकाळी घरी देवपूजा आणि आरती करायच्या, तसेच त्या उपवासही करायच्या.
इ. प्रतिदिन सायंकाळी ५ वाजता पू. कलावतीआईंच्या भजनाला जायच्या.
ई. तेथून घरी आल्यावर त्या देवाजवळ दिवा लावून दुर्गासप्तशती वाचायच्या आणि व्यंकटेश स्तोत्र, रामरक्षा अन् मारुति स्तोत्र म्हणायच्या.
६. पू. आजींनी अनुभवलेली देवाची अपार कृपा !
६ अ. ‘गॅस’ चालू असतांना ‘फिट’ येऊन तोंडावर पडणे; मात्र देवाच्या कृपेने मुलाने वाचवणे : वर्ष १९७२ मध्ये पू. आजींना ‘फिट्स’ (आकड्या) यायच्या. एकदा सकाळी उठल्यावर त्यांनी ‘गॅस’ पेटवला आणि त्याच वेळी ‘फिट’ येऊन त्यांचा तोंडवळा गॅसवर आपटला. तेवढ्यात त्यांच्या मुलाला (श्री. मिलिंद खेर याला) जाग आली आणि तो स्वयंपाक घरात गेला. त्यामुळे त्या वाचल्या. त्यांचा तोंडवळा गॅसवर आपटला असूनही त्यांच्या तोंडवळ्याला कोणतीही ईजा झाली नाही; पण त्यांचे पुढचे केस जळले. त्या करत असलेल्या साधनेमुळेच देवाने त्यांना वाचवले.
६ आ. प्रवास करतांना ‘एस्.टी.’ गतीरोधकावर आपटल्याने आसनावरून पडल्यामुळे मणका निसटणे, आधुनिक वैद्यांनी ‘त्यावर उपचार करता येणार नाहीत’, असे सांगणे; पण देवाच्या कृपेने त्यातून त्या बर्या होणे : एकदा पू. आजी ‘एस्.टी.’ने सातार्याला जात असतांना त्यांची ‘एस्.टी.’ गतीरोधकावर आपटली. त्यामुळे पू. आजी आसनावरून खाली पडल्या आणि त्यांच्या पाठीचा मणका निसटला. तेव्हा आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘त्यांच्यावर कुठलेच उपचार करता येणार नाहीत. हे असेच रहाणार.’’ तेव्हा त्यांना गादीवर झोपवून रत्नागिरीला आणले. घरातील सर्वांनाच ही परिस्थिती कठीण वाटत होती. तेव्हा त्यांचे वय ५२ वर्षे होते; पण देवाच्या कृपेने पू. आजी त्यातून बर्या झाल्या आणि आतापर्यंत, म्हणजे वयाच्या ८८ – ८९ व्या वर्षापर्यंत त्या घरकाम करत होत्या.’
७. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधना
७ अ. सनातनच्या सत्संगाला जाणे आणि नामजप चालू करणे : ‘वर्ष १९९७ मध्ये पू. खेरआजी घराजवळील विठ्ठल मंदिरात होत असलेल्या सनातनच्या सत्संगाला गेल्या. तेथील साधकांनी पू. आजींना ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा लघुग्रंथ दिला. घरी आल्यावर त्यांनी तो ग्रंथ पूर्ण वाचला. त्यात सांगितल्याप्रमाणे पू. आजींनी लगेचच ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करायला आरंभ केला. त्यातून त्यांना आनंद मिळू लागला. पू. आजी सत्संगात सांगितल्याप्रमाणे लगेचच कृती करू लागल्या.
७ आ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे : पू. आजी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी नियमित प्रयत्न करायच्या. पू. आजींनी ‘मला पालटायचे आहे’, असे मनाशी ठरवले होते. त्यांना शक्य होईल, तेवढे त्या स्वभावदोष-निर्मूलनाचे लिखाण करायच्या आणि त्याविषयीच्या शंका इतरांना विचारायच्या. (क्रमशः)
– सौ. माधुरी प्रकाश दीक्षित, सातारा (मोठी मुलगी, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के (रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील सौ. मंजिरी विनायक आगवेकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांच्या आई)) आणि सौ. मीनल मिलिंद खेर, रत्नागिरी (सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), रत्नागिरी (२३.३.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |