प्रेमळ, सेवाभावी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. चेतन हरिहर (वय ३७ वर्षे)!

चैत्र अमावास्या (३०.४.२०२२) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे श्री. चेतन हरिहर यांचा ३७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. चेतन हरिहर

श्री. चेतन हरिहर यांना ३७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. श्री. वैभव माणगावकर

‘स्वतःच्या सेवेचा, तसेच कुठल्याही सूत्राचा ते संबंधित साधकांना तत्परतेने आढावा देतात.’

२. सौ. प्रेरणा संदेश हजारे

२ अ. जाणवलेला पालट

१. ‘चेतन आता पुढाकार घेऊन सेवा करतात.

२. पूर्वी अकस्मात् एखादी सेवा आल्यास किंवा काही प्रसंग घडल्यास त्यांची चिडचिड व्हायची; पण आता ते शांतपणे प्रसंग हाताळतात.’

३. सौ. सुजाता अशोक रेणके

३ अ. ‘स्वतःला शारीरिक त्रास होत असतांना त्याकडे दुर्लक्ष करून ते आनंदी रहातात. ते थोडा वेळ हसत बोलले, तरी आम्हा सर्व साधकांना उत्साह वाटतो.

३ आ. त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे.

३ इ. जाणवलेला पालट : पूर्वी त्यांच्याकडे असलेली सेवा सोडून इतर सेवा करण्याची त्यांची सिद्धता नसायची. आता ते यासाठी चांगले प्रयत्न करत आहेत.’

४. श्री. अशोक रेणके

४ अ. ‘श्री. चेतन यांचे व्यक्तीमत्त्व अतिशय साधे-भोळे आहे.

४ आ. ते मूळ कन्नड भाषिक असूनही आश्रमात सर्वांशी मराठी भाषेतच बोलतात. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा गोडवा आहे.

४  इ. चेतन शीघ्र कवी आहेत. साधकांचा वाढदिवस असेल, तर त्यांच्यावर लगेच कविता करतात.

४ ई. ते इतरांच्या चुका सहजतेने आणि निःसंकोचपणे सांगतात. ‘चुका सांगतांना साधक दुखावणार नाहीत’, याचीही ते काळजी घेतात.

४ उ. सेवाभाव : ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठीच्या मराठी भाषेतील लिखाणाचे कन्नड भाषेत आणि कन्नड भाषेतील लिखाणाचे मराठी भाषेत भाषांतर करण्याची सेवा करतात. काही वेळा त्यांना शारीरिक त्रासही होत असतो, तरी त्याकडे दुर्लक्ष करून थोडा वेळ विश्रांती घेऊन ते लगेच सेवेला प्राधान्य देतात. अन्य सेवांत साधक अल्प असतील, तर ते लगेच साहाय्याला येतात. ते रुग्णाईत आणि वयस्कर साधकांना रुग्णालयात नेण्यासाठी तत्परतेने साहाय्य करतात.

४  ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव : ते नेहमी परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण करत असतात. ‘त्यांना झोपेतही गुरुदेव दिसतात’, असे ते सांगतात. त्यांनी स्वप्नात गुरुदेवांची स्थुलातून सेवा करत असल्याची आणि त्यांचे दर्शन झाल्याची अनुभूती घेतली आहे. त्यांनी स्वप्नात अनेक प्रसंगांत भावस्थिती अनुभवली आहे.’

५. सुश्री (कु.) युवराज्ञी शिंदे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के)

५ अ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : ‘चेतन यांना ‘सर्व साधकांची व्यष्टी साधना व्हावी’, अशी तळमळ असते. त्यामुळे ते ‘आपण समष्टी स्तरावर कसे प्रयत्न करू शकतो ?’, हे सुचवतात. सेवेची व्यस्तता असूनही त्यांची स्वयंसूचनांची सत्रे नियमित होतात.

५ आ. तत्परता : ते सेवेविषयीचे कुठलाही समन्वय तत्परतेने करतात. त्यांचा कधी पाठपुरावा करावा लागत नाही. आश्रमात अंघोळीसाठी सौरऊर्जेवर पाणी तापवले जाते. मध्यंतरी काही दिवस सौरऊर्जेवर पाणी तापण्यात अडचण येत होती. चेतन यांनी ‘पाणी ‘लीक’ होत असल्यामुळे तापलेले पाणी वाहून जात आहे’, हे शोधून काढले. यासाठी त्याने संबंधित साधकांना बोलावून त्यांच्याकडून ते तत्परतेने दुरुस्त करवून घेतले.

५ इ. दायित्व घेऊन सेवा करणे : त्यांना एखादे दायित्व दिले की, ते व्यवस्थित पार पाडतात. त्यात येणाऱ्या अडचणींविषयीही ते लगेच विचारतात. थंडीच्या दिवसांमध्ये त्यांना आश्रमातील सौरऊर्जेवर पाणी तापवण्याची सेवा दिली होती. त्या सेवेविषयी त्यांना एकही दिवस आठवण करून द्यावी लागली नाही. एका साधिकेने ‘गरम पाणी मिळण्यात अडचण येते’, असे सांगितल्यावर त्यांनी त्याविषयी इतरांना विचारले आणि ‘सौरऊर्जेवर पाणी तापवण्याच्या वेळेत कसा पालट करावा लागेल ?’, याविषयी अभ्यास केला. पाणी तापवण्याची सेवा पहाटे केली, तर साधकांना गरम पाणी मिळू शकेल’, हे लक्षात आल्यावर त्यांनी पहाटे उठून ही सेवा केली.

५ ई. चेतन सेवेतील बारकाव्यांचा अभ्यास करतात. त्यामुळे त्यांना त्यातील पुष्कळ पर्यायही सुचतात.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.४.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक