मशिदींवर लावलेल्या भोंग्यांविषयी सध्या भारतात जोरदार चर्चा चालू आहे. महाराष्ट्रामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी ‘मशिदींवर लावलेल्या भोंग्यामुळे समाजाला उपद्रव होत असल्याने ते काढावेत, नाही तर आम्ही मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा लावू’, असे विधान एका जाहीर सभेत केले होते. त्यानंतर या सूत्राविषयी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. ‘मशिदींवरील भोंगे हा धार्मिकतेचा विषय नसून तो सामाजिक आहे’, हे इस्लामी राष्ट्रांसह अनेक राष्ट्रांनी मानून मशिदींवरील भोंग्यांवर निर्बंध लावले आहेत. देशातील मुसलमानांनी याविषयी विचार करून नियमांचे पालन करावे.
१. सौदी अरेबियाने मशिदीवरील भोंगे हा सामाजिक विषय मानून त्याचा आवाज न्यून करणे
काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी याविषयीची केलेली टिपणी पहाता हे सूत्र धार्मिकतेविषयी नसून सामाजिकच आहे, असे लक्षात येते. राज ठाकरे यांनीही हीच गोष्ट प्रकर्षाने अधोरेखित केली. देशात याविषयी भिन्न मते असली, तरीही विदेशातील नागरिकांनी प्रार्थनास्थळावरील भोंगे हा विषय केवळ एक सामाजिक सूत्र ठेवले आहे. विशेषतः इस्लामी राष्ट्रांनीही नियमांचे पालन करण्यातच राष्ट्रहित मानले आहे.
याविषयी सौदी अरेबियाचे उदाहरण ताजे आहे. तेथील शेख महंमद बिन सालेह अल उथैमीन आणि सालेह बिन फवझान अल फवाझान यांनी एक फतवा काढत मशिदींवरील भोंग्यांची नियमावली घोषित केली. सौदी अरेबियानेच मशिदींवरील भोंग्यांवर बंदी आणली, ही गोष्ट तंतोतंत खरी आहे. तेथील नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा कांगावा न करता या नियमांचे पालन केले. सौदी अरेबियाचे इस्लामी व्यवहारमंत्री डॉ. अब्दुल्लातीफ अल शेख यांनी ‘ट्वीट’ केले, ‘मशिदींवरील भोंग्यांचा वापर हा केवळ प्रार्थनेला बोलावण्यासाठी आणि नमाजासाठी करावा, तसेच या भोंग्यांचा आवाज हा मशिदीपासून एक तृतीयांश परिघ अतंरापर्यंत ऐकू जाईल इतकाच असावा. अन्य कुठल्याही कारणांसाठी मशिदींवरील भोंगे वापरू नयेत. तसेच या नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’
२. मशिदीबाहेर भोंगे लावण्यास पूर्णपणे मज्जाव करणारे सौदी अरेबियामधील सरकार
सौदी अरेबिया सरकारच्या परिपत्रकानुसार भोंग्यांवरून बांग देण्याची मुभा केवळ मशिदीच्या आवारातच आहे ! मशिदीबाहेर कुठल्याही प्रकारचे भोंगे किंवा ‘ॲम्प्लिफायर’ (ध्वनीक्षेपक यंत्रणा) लावण्यास पूर्णपणे मज्जावच आहे. ‘या नियमांचे उल्लंघन करणारा कारवाईस पात्र आहे, तसेच भोंग्यांद्वारे मोठमोठ्याने धर्मग्रंथ वाचला जात असेल आणि तेथे उपस्थित असलेल्यांच्या व्यतिरिक्त कुणीही लक्ष देऊन ऐकत किंवा विचार करत नसेल, तर तो त्या विशिष्ट धर्मग्रंथाचा अवमान ठरील’, असे म्हटले आहे.
३. सौदी अरेबियात भोंग्यांच्या निर्बंधांना विरोध न होणे, तर भारतात राजकीय पक्षांनी विरोध करणे
इस्लामी राष्ट्रांमध्ये मशिदींवरील भोंग्यावर निर्बंध आहेत. आज भारतात प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांविषयी नियमावली सिद्ध करून कारवाईची मागणी केल्यावर इतर राजकीय पक्षांनी याला विरोध केला आणि वाद चालू झाला. याउलट सौदी अरेबियामध्ये याविषयीचा नियम लागू होऊन वर्ष उलटून गेले, तरीही तेथील कुठल्याही धर्माच्या नागरिकांनी याचा विरोध केलेला नाही.
४. प्रथम सिंगापूरच्या मशिदीवर भोंगे बसवले जाणे
भोंग्यांचा शोधच मुळात २०व्या शतकाच्या प्रारंभी लागला. मशिदींवरील भोंगे बसवण्यास प्रारंभ वर्ष १९३६ मध्ये चालू झाला. सर्वांत आधी सिंगापूरच्या सुल्ताना मशिदीवर भोंगे बसवले. या वेळी हा निष्कर्ष काढण्यात आला की, यामुळे ‘बांग’ ही दूरपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल. यानंतर हा पायंडा पडत गेला.
५. विदेशात मशिदींवरील भोंग्याच्या आवाजाला मर्यादा असणे
मशिदीतील भोंग्याच्या आवाजाने कालांतराने अनेक अडचणी निर्माण होत गेल्या. यात प्रामुख्याने एकापेक्षा जास्त मशिदी आहेत, अशा भागांत आवाजामुळे गोंगाट वाढत गेला. कालांतराने तंत्रज्ञानात सुधारणा होऊन भोंगेही अद्ययावत मिळू लागले. पहाटेच्या वेळी शांततेच्या वेळी आवाज अधिक दूरवर जातो. यामुळे त्रास होत असल्याने सौदी अरेबियासह नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, ब्रिटन, ऑस्ट्रिया, नॉर्वे आणि बेल्जियम शहरांत मशिदींवरील भोंग्यांवर आजही मर्यादा आहे. इंडोनेशियामध्येही प्रचंड मोठ्या वादानंतर भोंग्यांच्या आवाजावर मर्यादा आली आहे.
६. वर्ष २०१६ मध्ये नायजेरियामधील प्रशासनाने ध्वनीप्रदूषण न्यून करण्यासाठी ७० चर्च आणि २० मशिदींवरील ध्वनीक्षेपक हटवले होते.
७. भारतात न्यायालयाच्या निर्णयाचे पालन आवश्यक
बऱ्याच देशांमध्ये हे सूत्र धार्मिक वादातही परावर्तित झाले. त्यात चर्चमध्ये होणाऱ्या घंटांविषयीच्या सूत्रावरही वाद निर्माण झाला होता; परंतु कुठल्याही देशातील नागरिकांनी कायदा आणि नियमावली धुडकावली नाही. त्यांचे तंतोतंत पालन आजही केले जाते. विशेषतः बऱ्याच देशांनी प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचे सूत्र हा ‘ध्वनीप्रदूषण आणि त्याचा होणारा त्रास’ याच चौकटीत बसवून दाखवला. आपल्या देशातही न्यायालयाने भोंग्यांविषयी दिलेल्या निवाड्याप्रमाणेच पालन होणे आवश्यक आहे.
– तेजस परब
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)
संपादकीय भूमिकाइस्लामी राष्ट्रांसह अनेक राष्ट्रांमध्ये मशिदींवरील भोंग्यांवर निर्बंध आहेत, तर भारतात का नाही ? |